जळगाव प्रतिनिधी । राज्यशासनाच्या हस्तक्षेपाला कंटाळून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.डॉ. पी.पी.पाटील यांनी राजीनामा दिला आहे. याचा निषेध करण्यात येत असून राज्य शासनाने शिक्षण क्षेत्रातील वाढता हस्तक्षेप थांबवावा, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच शासनाच्या वाढत्या हस्तक्षेपाच्या प्रवृत्ती विरोधात सर्व शिक्षण तज्ञांनी एकत्र यावे, असे आवाहन विद्यापीठ विकास मंचतर्फे आज नवीपेठेतील कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेव्दारे करण्यात आले.
पत्रकार परिषदेला विद्यापीठ विकास मांचे विभाग प्रमुख व सिनेट सदस्य नितीन ठाकूर, अखिल भारतीय विद्यापीठ परिषदेचे प्रदेश मंत्री सिध्देश्वर लटपते, सिनेट सदस्य राजेंद्र नन्नवरे, मनीषा खडके, दिनेश नाईक, अमोल मराठे हे उपस्थित होते. पत्रकार परिषदेत माहिती देतांना नितीन ठाकूर म्हणाले की, गेले अनेक दिवस राज्य शासन विद्यापीठाच्या कामकाजात हस्तक्षेप करीत आहेत. विद्यापीठाकडील शिल्लक निधी शासनाकडे वर्ग करण्याचा आग्रह, परिक्षा घ्याव्यात की नाही, आपात्कालीन परिस्थितीमध्ये परिक्षा पध्दती कशी असावी? आपातकालीन परिस्थितीमध्ये परिक्षा पध्दती कशी असावी, विद्यापीठाच्या खर्चातून जनता दरबार भरवणे, मुंबई विद्यापीठ, व राष्टसंत तुकडोजी महाराज नागपूर नियुक्तीसंदर्भात हस्तक्षेप, अशा प्रकारे राजकीय हेतून प्रेरीत होवून करत असलेल्या हस्तक्षेपाला कंटाळून राजीनामा देणे ही शिक्षण क्षेत्रासाठी दुर्देवी बाब आहे.
विद्यापीठात मागील चार वर्षापासून कुलगुरु प्रा.डॉ .पी.पी.पाटील यांच्या कार्यकाळात विद्यापीठाचा कारभार सुरळीतपणे सुरु असतांना राज्यात अस्तित्वात आल्यापासून काही संघटनेच्या पदाधिकार्यांनी वैयक्तिक प्रसिध्दीसाठी कुलगुरु व विद्यापीठ प्रशासनावर केलेल्या चुकीच्या आरोपामुळे व्यथित होवून एका वैज्ञानिक संवेदनशील आणि खान्देशाचे भूमिपूत्र असलेल्या कुलगुरुंनी राजीनामा दिला असावा, असे आमचे मत असून अलीकडे जे चुकीचे पायंडे पाडले जात आहेत ते दुर्देवी असल्याचेही पत्रकार परिषदेत पदाधिकार्यांनी सांगितले.