विधानपरिषद सदस्यांच्या निवडीसाठी राज्यपालांना मुदत

मुंबई प्रतिनिधी । विधानपरिषदेवर करण्यात येणार्‍या १२ सदस्यांची शिफारस करतांनाच राज्य सरकारने राज्यपालांना १५ दिवसांची मुदत दिली असल्याची माहिती आज समोर आली आहे.

राज्यातील महाविकास आघाडीतर्फे अलीकडेच राज्यपालांना विधानपरिषदेवर नियुक्त करण्यासाठी १२ सदस्यांच्या नावांची यादी सुपूर्द करण्यात आली आहे. यात भाजपमधून नुकतेच राष्ट्रवादीत आलेले एकनाथराव खडसे, माजी खासदार राजू शेट्टी आदींसह अन्य मान्यवरांचा समावेश आहे. अनिल परब, नवाब मलिक आणि अमित देशमुख या तिन्ही पक्षाच्या मंत्र्यांनी ही यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सुपूर्द केली होती. त्याच वेळी या नावांबाबत राज्यपालांनी १५ दिवसांच्या आत निर्णय घ्यावा असे नमूद करण्यात आले आहे. अर्थात, यानुसार आता राज्यपालांना २१ नोव्हेंबरपर्यंत या सदस्यांची नावे फायनल करावी लागणार आहेत.

दरम्यान, राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्यांच्या नियुक्तीवरून आता कुरघोडीचे राजकारण रंगणार असल्याचेही संकेत मिळाले आहेत. सरकारने पाठविलेल्या काही नावांना राज्यपाल कोश्यारी हे कात्री लाऊ शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे यावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे.

Protected Content