जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्रातील बालकलावंतांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ देणारी आणि त्यांच्या सुप्त कला गुणांना आकार देणारी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा ही केवळ स्पर्धा नसून एक सांस्कृतिक चळवळ आहे. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ सातत्याने सुरू असलेली ही परंपरा नव्या पिढीतील कलाकार घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत असून, याच परंपरेचा एक भाग म्हणून जळगाव येथे २२ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ झाला.

बालरंगभूमी परिषद मध्यवर्तीचे प्रभारी प्रमुख कार्यवाह योगेश शुक्ल यांनी उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना राज्य बालनाट्य स्पर्धेचे महत्त्व अधोरेखित केले. ही स्पर्धा देशातील एकमेव अशी बालकलावंतांसाठी चालणारी चळवळ असून महाराष्ट्र शासनाद्वारे गेल्या २१ वर्षांपासून सातत्याने आयोजित केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. १९७९ साली जळगाव जिल्ह्यात पहिले बालनाट्य करणारे ज्येष्ठ रंगकर्मी चिंतामण पाटील यांच्याकडे बालनाट्य करत घडलेला एक बालकलावंत आज या स्पर्धेचा उद्घाटक म्हणून उपस्थित असणे, हे एका संपूर्ण पिढीचे वर्तुळ पूर्ण झाल्याचे द्योतक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. आज प्रेक्षकांमध्ये बसलेला बालप्रेक्षक भविष्यात या स्पर्धेचा उद्घाटक होईल, तेव्हाच या उपक्रमाचे खरे यश साकार होईल, असे त्यांनी नमूद केले.

आज (दि.२०) शहरातील छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात झालेल्या उद्घाटन सोहळ्याला सांस्कृतिक, नाट्य आणि मनोरंजन क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. उद्घाटक म्हणून योगेश शुक्ल यांच्यासह हास्यजत्रा फेम अभिनेते हेमंत पाटील, ज्येष्ठ रंगकर्मी चिंतामण पाटील, प्रा. राजेंद्र देशमुख, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळ सदस्या गीतांजली ठाकरे उपस्थित होत्या. तसेच परीक्षक म्हणून डॉ. अमजद सैय्यद (बीड), वनिता जीवने (नागपूर) आणि प्रा. प्रदीप कांबळे (छत्रपती संभाजीनगर) यांनी हजेरी लावली. स्पर्धेचे समन्वयक प्रा. संदीप तायडे, सहसमन्वयक नितीन तायडे, सुभाष गोपाळ यांच्यासह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते.
नटराजपूजन, दीपप्रज्वलन आणि घंटानादाने स्पर्धेचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन मानसी नेवे यांनी केले, तर आभारप्रदर्शन नितीन तायडे यांनी मानले. संपूर्ण कार्यक्रमात बालरंगभूमीच्या समृद्ध परंपरेचा आणि भविष्यातील आशावादाचा प्रत्यय उपस्थितांना आला.
या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील एकूण ४३ बालनाट्य संघ सहभागी झाले आहेत. दि. २० जानेवारी ते २५ जानेवारी या कालावधीत दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत सहा बालनाट्यांचे सादरीकरण होणार आहे. या बालनाट्यांच्या माध्यमातून बालकलावंतांच्या अभिनय, संवाद, सादरीकरण आणि सर्जनशीलतेचे विविध पैलू प्रेक्षकांसमोर उलगडणार आहेत.



