एरंडोल (प्रतिनिधी) येथील अंजनी प्रकल्पातील जमा झालेला गाळ परिसरातील शेतकऱ्यांना मोफत देण्याच्या कामाचा शुभारंभ प्रांताधिकारी विनय गोसावी यांच्या हस्ते आज (दि.१७) करण्यात आला. परिसरातील शेतकऱ्यांनी हा गाळ नेऊन आपली जमीन सुपीक करावी, असे आवाहनही प्रांताधिकाऱ्यांनी यावेळी केले.
दुष्काळामुळे यावर्षी अंजनी प्रकल्प कोरडाठाक पडला असून धरणात गाळही मोठ्या प्रमाणावर जमा झाला आहे. त्या निमित्ताने महाराष्ट्र शासन व अनुलोम संस्था, यांच्या संयुक्त विद्यमाने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार व सुपीक शिवार करण्यास आजपासून सुरवात करण्यात आली आहे. या उपक्रमाने धरणाची खोली वाढून शेतकऱ्याची जमीनही सुपीक दर्जेदार होण्यास मदत होणार आहे. या उपक्रमाचे शेतकरी वर्गाकडून स्वागत करण्यात आले आहे. या उद्धघाटनप्रसंगी एरंडोल येथील आदर्श शेतकरी आर.डी. पाटील, प्रसाद दंडवते व परिसरातील, खडकेसीम, खडके खु., जवखेसीम, कासोदा, पिंपळकोठा येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच अनुलोम संस्थेचे सागर रायगडे व वस्ती मित्र अतुल मराठे, अर्जुन पाटील, विशाल पाटील, सुयोग पाटील आदी मान्यवरही यावेळी उपस्थित होते.