सीसीआय खरेदी केंद्र सुरू करा; मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यात कापूस हे प्रमुख पीक असून, शेतकऱ्यांसाठी हेच मुख्य आर्थिक आधारस्तंभ आहे. मात्र, सततच्या निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. सुरूवातीला झालेल्या अतिवृष्टीमुळे कापसाची वाढ खुंटली आणि परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिणामी, उत्पादनात ४० ते ५० टक्के घट झाली असून, खर्च वाढल्याने शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक भार आला आहे.

अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी सरकारी हमीभावाने खरेदी होणे गरजेचे आहे. मात्र, जिल्ह्यातील सीसीआय खरेदी केंद्र अचानक बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. सध्या ४० ते ४५ टक्के कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे, पण व्यापारी अत्यल्प दराने कापूस खरेदी करत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सीसीआय खरेदी केंद्र त्वरित सुरू करण्याची मागणी केली आहे. धुळे आणि बुलढाणा जिल्ह्यात खरेदी सुरू असताना जळगावमध्येच खरेदी बंद का? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

सीसीआय खरेदी केंद्र त्वरित सुरू न केल्यास मनसे स्टाईल आंदोलन छेडले जाईल, असा इशारा मनसे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश भास्कर पाटील यांनी दिला आहे. या मागणीसाठी प्रदीप पाटील (तालुका अध्यक्ष), संदीप मांडोळे, विलास सोनार (तालुका संघटक), देवेन्द्र माळी (तालुका उपाध्यक्ष), हर्षल वाणी (शहर सचिव), मनोज लोहार (तालुका सचिव) आणि अशोक कोळी यांनीही सहकार्य केले आहे. शेतकऱ्यांच्या हक्काच्या कापूस खरेदीसाठी प्रशासनाने त्वरित निर्णय घ्यावा, अन्यथा मनसेच्या आक्रमक आंदोलनास सामोरे जावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.

Protected Content