जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांसाठी डिजिटल सुविधांचा मोठा निर्णय घेत ‘RuPay ON THE GO enabled with NCMC’ कार्ड प्रकल्पास मंजुरी दिली आहे. सध्या सवलतीचे पास हस्तलिखित पद्धतीने वितरीत केले जात असताना आता या नव्या कार्डमुळे सवलत व विनासवलत प्रवाशांसाठी एकत्रित, सुरक्षित आणि डिजिटल प्रवास प्रणाली लागू होणार आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत यास अधिकृत मान्यता देण्यात आली असून लवकरच राज्यभरात टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी होणार आहे.
मा. संचालक मंडळ बैठक क्र. ३०७, दि. ०७ मे २०२५ रोजी ठराव क्र. २०२५:०५:१९ नुसार या प्रकल्पास मंजुरी देण्यात आली. मे. ईबिक्स टेक्नोलॉजिस लि. आणि NSDL Payments Bank यांच्या सहयोगाने हे पर्सनलाइज्ड कार्ड वितरीत करण्यात येणार आहे. हे कार्ड ‘अहस्तांतरणीय’ असून त्यावर प्रवाशाचे नाव व फोटो छापलेले असेल. या कार्डमध्ये ऑनलाइन व ऑफलाइन वॉलेटची सुविधा असेल आणि शासनमान्य सर्व सवलतींची माहिती त्यात नोंदवलेली असेल.

कार्डमध्ये तीन प्रमुख घटकांचा समावेश आहे. पहिला म्हणजे शासनाद्वारे मंजूर सवलतींचा समावेश. दुसरा म्हणजे ऑनलाइन वॉलेट, ज्यामध्ये मोबाईल बँकिंग, नेट बँकिंग, यूपीआय आदी माध्यमांतून रक्कम टॉपअप करता येईल आणि आरक्षण किंवा इतर व्यवहार करता येतील. तिसरा घटक म्हणजे ऑफलाइन वॉलेट, ज्यातून बसमध्ये थेट तिकीट खरेदी करता येईल. सवलतीचे तिकीट काढण्यासाठी ऑफलाइन वॉलेटमध्ये आवश्यक तितकी शिल्लक असणे बंधनकारक असेल.
विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग, पत्रकार, स्वातंत्र्य सैनिक, विविध पुरस्कार प्राप्त व्यक्ती तसेच गंभीर आजारग्रस्त रुग्ण अशा सर्व सवलतधारकांना हे कार्ड उपलब्ध होईल. दिव्यांगांसाठी युडीआयडी कार्डद्वारे नोंदणीची सुविधा विकसित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठी रु. ५ अर्ज शुल्क आकारले जाईल आणि सरल/PEN क्रमांक आवश्यक असेल. आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक व बायोमेट्रिक प्रमाणीकरणाद्वारे नोंदणी पूर्ण केली जाईल.
राज्यभरातील २५१ आगार, सुमारे ३३५ वाहतूक नियंत्रण कक्ष तसेच ३००० हून अधिक अधिकृत एजंटमार्फत नोंदणी व वितरण प्रक्रिया राबवली जाईल. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर ३० दिवसांत कार्ड छापून संबंधित आगारात पाठवले जाईल. कार्ड उपलब्ध झाल्यानंतर एसएमएसद्वारे माहिती देण्यात येईल आणि POS मशिनद्वारे अॅक्टिवेशन करून कार्ड वितरीत केले जाईल.
कार्डची किंमत नव्या लाभार्थ्यांसाठी रु. १११ (सर्व करांसह) निश्चित करण्यात आली आहे. पूर्वीच्या स्मार्टकार्डधारकांसाठी ठराविक अटींनुसार रु. १४९ किंवा रु. १४१ आकारले जातील. कार्ड हरवल्यास किंवा खराब झाल्यास रु. १९९ शुल्क आकारून नवीन कार्ड देण्यात येईल. ब्लॉक केलेल्या कार्डमधील ऑनलाइन वॉलेटची रक्कम नवीन कार्डवर वर्ग केली जाईल; मात्र ऑफलाइन वॉलेटमधील शिल्लक रक्कम परत मिळणार नाही.
टॉपअपसाठी किमान रु. ५० किंवा त्याच्या पटीत रक्कम भरणे आवश्यक राहील. प्रत्येक टॉपअपवर ०.१% सुविधा शुल्क व वस्तू व सेवा कर आकारला जाईल. बसस्थानकावरील अधिकृत एजंट, ईटीआयएम मशिन, संकेतस्थळ व मोबाईल अॅपद्वारे टॉपअपची सुविधा उपलब्ध असेल. १८ वर्षांवरील कार्डधारकांना ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही वॉलेट मिळतील, तर १८ वर्षांखालील कार्डधारकांना फक्त ऑफलाइन वॉलेट उपलब्ध असेल.
कार्डचा वापर करताना प्रवाशाकडे कार्ड असणे अनिवार्य राहील. प्रवासादरम्यान तिकीट जतन करणे बंधनकारक असेल; अन्यथा विना तिकीट प्रवासी समजून दंडात्मक कारवाई होईल. विभागीय अधिकाऱ्यांना तपासणीबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. लेखा व माहिती तंत्रज्ञान खात्याच्या सहमतीने हे परिपत्रक प्रसारित करण्यात आले असून लवकरच सविस्तर SOP जारी केली जाणार आहे.
एकूणच, ‘RuPay ON THE GO – NCMC’ कार्डमुळे एसटी प्रवास अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि डिजिटल होणार असून सवलतधारक प्रवाशांसाठीही प्रक्रिया सुलभ होणार आहे.



