Home Cities अमळनेर श्री क्षेत्र कपिलेश्वर महादेव यात्रोत्सवाचा उद्यापासून प्रारंभ

श्री क्षेत्र कपिलेश्वर महादेव यात्रोत्सवाचा उद्यापासून प्रारंभ


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्याच्या पश्चिमेला नीम गावाजवळील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र कपिलेश्वर महादेव मंदिराचा महाशिवरात्रीनिमित्त यात्रोत्सव उद्या (ता. १५) पासून सुरू होत असून, यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपासूनच परप्रांतीय भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. हा यात्रोत्सव सुमारे पंधरा दिवस चालणार आहे.

जळगाव व धुळे जिल्ह्याच्या सीमारेषेवर वसलेले आणि सुमारे हजार वर्षांचा इतिहास लाभलेले हे मंदिर खान्देशातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते. तापी, पांझरा आणि गुप्तगंगा या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर ऋषी कपिल मुनी यांनी तपश्चर्या करून शिवलिंगाची स्थापना केल्याची धार्मिक मान्यता आहे. विशेष म्हणजे सूर्योदयाच्या वेळी सूर्यकिरणे थेट शिवपिंडीवर पडतात, हा अद्भुत अनुभव भाविकांना पाहता येतो.

या मंदिराचे महत्त्व स्कंदपुराणातही वर्णन करण्यात आले असून सन २००५ मध्ये येथे अखिल भारतीय संत संमेलन झाले होते. मंदिरालगत अनिरुद्ध बापूंचा आश्रम असून दर शनिवारी व रविवारी राज्यभरातून भाविक येथे येत असतात. मठाधिपती हंसानंद महाराज यांनी येथे बालकांसाठी वेधशाळाही सुरू केली आहे.

मंदिरात तीन शिवलिंगांची स्थापना असून वर्षभर भाविकांची वर्दळ असते. अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचे बांधकाम केल्याची माहिती आहे. यात्रोत्सवानिमित्त पाळणे, उपहारगृहे, संसारोपयोगी वस्तू व खेळण्यांची दुकाने उभारण्यात आली आहेत. अमळनेर आगारातर्फे अतिरिक्त एसटी बसची सोय करण्यात आली असून मारवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जिभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. भाविकांकडून नवस फेडण्यासाठी दाळ-बट्टीचा नैवेद्य अर्पण केला जात आहे.


Protected Content

Play sound