नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी आजीवन बंदीची शिक्षा झालेला टीम इंडियाचा गोलंदाज श्रीसंतला आज सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. बीसीसीआयकडून श्रीसंतवर लावण्यात आलेली बंदी सुप्रीम कोर्टाने हटवली असून श्रीसंतला यापुढेही क्रिके़ट खेळण्याची संधी मिळाली आहे. त्याचसोबत सुप्रीम कोर्टाने बीसीसीआयला श्रीसंतवर बंदी घातलेल्या निर्णयाचा तीन महिन्यात पुर्नविचार करण्याचा आदेश दिला आहे.
श्रीसंतने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. कनिष्ठ न्यायालय आणि हायकोर्टानेही श्रीसंतला दिलासा दिला असताना बीसीसीआयकडून बंदी हटविण्यात आली नाही. त्यामुळे बीसीसीआयच्या निर्णयाला श्रीसंतने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. यावर सुप्रीम कोर्टाने श्रीसंतवरील बंदी हटवली आहे. श्रीसंतने सुप्रीम कोर्टाचे आभार मानताना म्हणाला की, कोर्टाच्या या निर्णयामुळे मला पुन्हा क्रिकेटच्या मैदानात खेळण्याची संधी मिळणार आहे. २०१३ साली झालेल्या आयपीएल स्पर्धेत स्पॉट फिक्सिंग केल्याचा आरोप श्रीसंतवर झाला होता. त्यानंतर बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीने त्याच्यावर बंदीची कारवाई केली होती. या कारवाईला श्रीसंतने आधी केरळ उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, केरळ उच्च न्यायालयाने बीसीसीआयचा निर्णय उचलून धरला. त्यानंतर श्रीसंतने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तिथे त्याला आज दिलासा मिळाला. ‘श्रीसंतवरील बंदीचा कालावधी खूपच जास्त आहे. बीसीसीआयने त्यावर फेरविचार करावा आणि ३ महिन्यांत निर्णय घ्यावा’, असे आदेश न्यायालयाने दिले. खेळाडूला शिक्षा देण्याचा अधिकार बीसीसीआयला नाही, हा श्रीसंतचा युक्तिवाद मात्र न्यायालयाने फेटाळून लावला. क्रिकेटपटूंवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा अधिकार बीसीसीआयला आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.