मुंबई-वृत्तसेवा । राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याच्या अफवांमुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक शहरांमध्ये पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी वाढत्या गर्दीमुळे पंपचालकांनी मर्यादित प्रमाणात इंधन देण्याचा निर्णय घेतला असून परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. मात्र, सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की राज्यात इंधनाचा कोणताही तुटवडा नसून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.
राज्यात यापूर्वी गॅस सिलेंडरच्या तुटवड्याबाबतही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी एजन्सीबाहेर मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या. त्यानंतर आता पेट्रोल-डिझेलच्या संदर्भातही तशाच प्रकारच्या अफवा पसरल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात इंधन साठवण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे मागणी अचानक वाढल्याने पुरवठा साखळीवर ताण निर्माण झाला असून काही ठिकाणी कृत्रिम टंचाई जाणवत आहे.

राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी या परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. मागील काही महिन्यांत इंधनाची मागणी दीडपट वाढल्यामुळे तात्पुरती अडचण निर्माण होत असल्याचे दिसत असले तरी प्रत्यक्षात कोणतीही कमतरता नाही. नागरिकांनी अनावश्यक साठेबाजी करू नये आणि संयम बाळगावा, असे आवाहन त्यांनी केले.
नाशिकसह विविध शहरांमध्ये पेट्रोल पंपांवर वाढलेल्या गर्दीबाबतही त्यांनी भाष्य केले. सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवांमुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण होत आहे आणि त्यामुळेच पंपांवर रांगा लागत आहेत. काही पंपचालकांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी 200 ते 300 रुपयांपर्यंतच पेट्रोल देण्याची मर्यादा घातली आहे. मात्र, ही तात्पुरती उपाययोजना असून पुरवठा नियमित सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मंत्री महाजन यांनी सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा इशाराही दिला आहे. पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. तसेच, नागरिकांनी अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा आणि कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
कमर्शियल गॅसच्या संदर्भात काही प्रमाणात तुटवडा असल्याचे मान्य करताना घरगुती गॅस सिलेंडरची उपलब्धता सुरळीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांना घरपोच सेवा सुरू असून एजन्सीवर गर्दी करण्याची गरज नसल्याचेही त्यांनी नमूद केले. याशिवाय, पर्यायी इंधन म्हणून रॉकेलचा वापर करण्याचाही पर्याय उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.



