जळगाव (प्रतिनिधी) शहरात गेल्या सुमारे तीन वर्षांपूर्वी सुरु झालेल्या रस्त्यावरील विक्रेत्यांच्या स्टॉलचे आता एका गजबजलेल्या बाजारात रुपांतर झाले आहे. ‘संडे बाजार’ नावाने सध्या प्रचलित असलेल्या या बाजाराला शहरातील मध्यम आर्थिक परिस्थिती असलेल्या तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून येणाऱ्या ग्रामस्थांचा अलीकडे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे.
रविवारी शहरातील रस्त्यालगतची सगळी दुकाने बंद रहात असल्याने या दुकानांपुढे असलेल्या मोकळ्या जागेत महापालिकेच्या प्रवेशद्वारापासून ते बिग बाजारच्या प्रवेशद्वारापर्यंत हा बाजार भरतो. कपडे, चपला-बूट, कमरपट्टे, बॅगा अशा विविध वस्तू या बाजारात माफक दरात आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. ग्राहकांच्या खिशाला परवडणारा हा बाजार अनेकांना रोजगार मिळवून देण्यातही मोठे योगदान देत आहे.