Home Cities अमळनेर कळमसरेत महावितरणच्या जनजागृती रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

कळमसरेत महावितरणच्या जनजागृती रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कळमसरे ग्रामपंचायतीच्या परिसरात महावितरण अमळनेर उपविभाग क्र. २ च्या वतीने ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजना’ आणि ‘पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना’बाबत माहिती देण्यासाठी भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, दोन्ही योजनांच्या लाभांविषयी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण झाली आहे.

या कार्यक्रमात उपकार्यकारी अभियंता नितीन भगवान चौधरी यांनी “पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना” अंतर्गत घराच्या छतावर सौर ऊर्जा संच बसवून वीजबिलापासून कसा बचाव करता येतो, याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन प्रत्येक घराला स्वावलंबी वीज निर्मितीकडे वळण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे, “मागेल त्याला सौर कृषी पंप योजना” संदर्भात मारवड कक्षाचे कनिष्ठ अभियंता भाऊसाहेब महाजन यांनी मार्गदर्शन करत शेतकऱ्यांना शेतामध्ये सौर पंप बसवल्यास होणारे फायदे स्पष्ट केले.

या कार्यक्रमानंतर कळमसरे गावातून भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत महावितरणचे वरिष्ठ व कनिष्ठ अभियंते, कर्मचारी आणि गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. रॅलीच्या माध्यमातून गावातील प्रत्येक नागरिकापर्यंत सौर योजनांची माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या उपक्रमात कळमसरे कक्षाचे सहाय्यक अभियंता देवेश्वर घरजारे, अमळगाव कक्षाचे सहाय्यक अभियंता उज्वल पाटील, अमळनेर उपविभागाचे गुणक नियंत्रक अभियंता निलेश पवार, आणि इतर तांत्रिक कर्मचारी उपस्थित होते. विशेष म्हणजे गावकऱ्यांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग घेत सकारात्मक प्रतिसाद दिला.

या जनजागृती मोहिमेचा उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील नागरिकांना नवनवीन सौरऊर्जा योजनांची माहिती देणे व त्यांना सशक्त बनवणे. महावितरणच्या या उपक्रमामुळे सौर ऊर्जेबाबत गावात जागरूकता वाढली असून, भविष्यात अधिकाधिक नागरिक या योजनांचा लाभ घेतील, असा विश्वास व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound