Home आरोग्य गोदावरी आयएमआरमध्ये पाच दिवसीय नॅशनल एफडीपीला उत्स्फूर्त प्रतिसाद 

गोदावरी आयएमआरमध्ये पाच दिवसीय नॅशनल एफडीपीला उत्स्फूर्त प्रतिसाद 


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या “ऍडव्हान्स रिसर्च मेथोडोलॉजी, इथिक्स अँड एआय टू पब्लिकेशन अँड फंडिंग” या विषयावरील पाच दिवसीय राष्ट्रीय एफडीपी (Faculty Development Program) कार्यशाळेला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. ११ मेपासून सुरू झालेल्या या कार्यशाळेत तब्बल १३४२ प्राध्यापक, संशोधक आणि शिक्षण क्षेत्रातील अभ्यासकांनी सहभाग नोंदविला असून संशोधन क्षेत्रात एआयचा प्रभावी आणि नैतिक वापर या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

११ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत पार पडणाऱ्या या राष्ट्रीय कार्यशाळेत विविध क्षेत्रातील तज्ज्ञ प्राध्यापक आणि संशोधक सहभागी होत आहेत. कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी डॉ. ज्ञानेश्वर किरंगे यांनी मार्गदर्शन केले. पुढील सत्रांमध्ये १२ मे रोजी डॉ. संदीप पाटील, १३ मे रोजी मुंबई येथील डॉ. नीता पाटील, १४ मे रोजी डॉ. प्रियंका बऱ्हाटे आणि १५ मे रोजी डॉ. हेमंत इंगळे हे मान्यवर संशोधन क्षेत्रातील विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल माहिती देणार आहेत.

या कार्यशाळेत आधुनिक संशोधन प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयचा प्रभावी वापर, संशोधनातील नैतिकता, प्लॅजिअरिझम टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना, Scopus आणि UGC Care जर्नल्समधील संशोधन प्रकाशन प्रक्रिया तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संशोधन निधी योजनांविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे. संशोधन प्रस्ताव लेखनातील तांत्रिक बाबींवरही विशेष भर दिला जाणार आहे.

कार्यशाळेचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे संशोधनासाठी वापरल्या जाणाऱ्या अत्याधुनिक एआय आधारित साधनांचे प्रात्यक्षिक. यामध्ये Zotero, SciSpace, Paperpal आणि Claude AI यांसारख्या आधुनिक संशोधन सहाय्यक साधनांचा वापर कसा करावा याचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. संशोधन प्रक्रियेत एआयचा वापर करताना शैक्षणिक प्रामाणिकता आणि नैतिकतेचे पालन कसे करावे यावरही विशेष चर्चा होणार आहे.

संशोधन प्रकाशनातील गुणवत्ता, योग्य जर्नलची निवड, संशोधन लेखनातील बारकावे आणि संशोधनासाठी निधी मिळविण्याची प्रक्रिया यावरही कार्यशाळेत सखोल मार्गदर्शन दिले जाणार आहे. अलीकडील काळात भारतातील संशोधन निधी देणाऱ्या संस्थांनी एआयच्या वापराबाबत आणि संशोधन नैतिकतेबाबत कठोर नियम लागू केले असून त्या संदर्भातील आवश्यक माहिती सहभागी संशोधकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे.

या पाच दिवसीय कार्यशाळेमुळे सहभागी प्राध्यापक आणि संशोधकांना आधुनिक संशोधन कौशल्य आत्मसात करण्यास मोठी मदत होणार आहे. एआयचा जबाबदारीने वापर करत गुणवत्तापूर्ण संशोधन आणि प्रकाशन कसे करावे यासाठी आवश्यक दिशा या उपक्रमातून मिळणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रमाच्या समारोपावेळी सर्व सहभागींना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

या राष्ट्रीय एफडीपीचे आयोजन गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे कॉन्व्हेनर म्हणून डॉ. प्रशांत वारके (डायरेक्टर, जीआयएमआर) कार्यरत असून समन्वयक म्हणून प्रा. चारुशीला चौधरी यांनी जबाबदारी सांभाळली आहे. आयोजन समितीत डॉ. नीलिमा वारके, डॉ. चेतन सरोदे, प्रा. स्मिता चौधरी आणि प्रा. वैजयंती असोदेकर यांचा समावेश आहे. तर सल्लागार समितीत डॉ. पराग नारखेडे, डॉ. जी. के. पटनाईक, डॉ. मनोज बेहरे आणि डॉ. प्राजक्ता पाटील यांचा सहभाग आहे. समन्वय समितीत प्रा. पायल भंगाळे आणि प्रा. लीना पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.


Protected Content

Play sound