Home Cities पाचोरा बच्चू कडु यांच्या शेतकरी आंदोलनाला पाचोऱ्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

बच्चू कडु यांच्या शेतकरी आंदोलनाला पाचोऱ्यात उत्स्फूर्त प्रतिसाद


पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नागपूर येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडु यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला समर्थन म्हणून पाचोरा शहरात ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता प्रहार संघटना आणि महाराष्ट्र राज्य कृषी उत्पादक संघटनेतर्फे भव्य जेलभरो आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांचा आवाज बुलंद केला.

या आंदोलनात प्रहार संघटना आणि कृषी उत्पादक संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी बच्चू कडु यांच्या समर्थनार्थ “शेतकऱ्यांच्या लढ्याला सलाम” अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

आंदोलनानंतर मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी, तहसीलदार आणि पोलिस प्रशासन यांना देण्यात आले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी पाचोरा पोलिस स्टेशनवर “जेलभरो” आंदोलन करत अटक देऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत शासनाचे लक्ष वेधले.

या आंदोलनात शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये सातबारा कोरा करण्याची मागणी, वाढत्या महागाईनुसार शेतमालाचा हमीभाव वाढवणे आणि त्याची १०० टक्के अंमलबजावणी करणे, तसेच भावांतर योजना तत्काळ सुरू करून शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यावर १५ दिवसांत फरकाची रक्कम देणे या मागण्या करण्यात आल्या. शिवाय, भारतीय न्यायालयांनी शेतकऱ्यांबाबत न्यायनिवाडा करताना विलंब न करता नैसर्गिक तत्त्वावर निर्णय द्यावेत, अशीही मागणी या वेळी करण्यात आली.

आंदोलनकर्त्यांनी शासनाला इशारा दिला की, जर शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाले, तर राज्यभर आणखी तीव्र आंदोलन उभारले जाईल. बच्चू कडु यांच्या आंदोलनाला पाचोरा शहरातून मिळालेला हा उत्स्फूर्त प्रतिसाद शेतकरी एकतेचा आणि संघर्षशीलतेचा ठसा उमटवणारा ठरला आहे.


Protected Content

Play sound