जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भालोद येथे आयोजित करण्यात आलेल्या कृषी मेळाव्यास परिसरातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त व सकारात्मक प्रतिसाद लाभला असून आधुनिक शेती तंत्रज्ञान, केळी लागवड, खत व्यवस्थापन व पूरक व्यवसायाबाबत तज्ज्ञांनी केलेल्या मार्गदर्शनाचा शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला.
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव येथील कृषीदूत आणि फैजपूर कृषीकन्या यांच्या संयुक्त विद्यमाने भालोद येथे कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन फैजपूरच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा दामिनी पवन सराफ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष निलेश मुरलीधर राणे, नगरसेविका जयश्री नरेंद्र चौधरी, नगरसेवक पवन अनिल सराफ व राहुल गुजराथी यांच्यासह कृषीभूषण नारायण बापू चौधरी, मंडळ कृषी अधिकारी भालचंद्र देविदास ढाळे, उप कृषी अधिकारी महेश आगीवाल, सहाय्यक कृषी अधिकारी एस.आर. कंकाळ, महेंद्र पाटील, हितेंद्र चौधरी, पशुधन पर्यवेक्षक सुरेश अंगवार तसेच महाधनचे असिस्टंट मॅनेजर मिलिंद चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा. बी. एम. गोणशेटवाड यांनी मांडली. त्यानंतर कृषीदूत ललित वाढी, वैभव चौधरी, भावेश पांडव आणि कृषीकन्या नेत्रा खराटे यांनी मेळाव्याचे उद्दिष्ट व आधुनिक शेतीतील विविध संधी याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली. मंडळ कृषी अधिकारी भालचंद्र ढाळे यांनी महाविस्तार योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली.
कृषीभूषण नारायण बापू चौधरी यांनी केळी लागवडीचे आधुनिक तंत्र, उत्पादन वाढविण्याचे उपाय आणि केळीवरील रोगांचे नियंत्रण याबाबत सखोल मार्गदर्शन केले. मिलिंद चौधरी यांनी खतांमधील वाढती फसवणूक ओळखण्याचे मार्ग आणि पूरक व्यवसायाचे महत्त्व स्पष्ट केले. गणेश गुरव यांनी शेळीपालन व कुक्कुटपालन या व्यवसायातून शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न कसे मिळवता येईल याबाबत मार्गदर्शन केले. पशुधन पर्यवेक्षक सुरेश अंगवार यांनी जनावरांचे संगोपन, आरोग्य आणि व्यवस्थापन याबाबत उपयुक्त माहिती दिली.
या मेळाव्यादरम्यान प्रा. बी. एम. गोणशेटवाड यांच्या हस्ते शेतकऱ्यांना आकर्षक भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषीकन्या साक्षी चंद्रकांत काळे आणि मिनल कवडुजी कार्लेकर यांनी केले, तर विशाखा संजय रायकर यांनी आभार मानले.
या कृषी मेळाव्यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, पूरक व्यवसाय आणि उत्पादनवाढीसाठी आवश्यक असलेली महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असून अशा उपक्रमांमुळे शेती अधिक फायदेशीर आणि शाश्वत करण्यास निश्चितच मदत होणार असल्याची भावना उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केली.



