जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खोटे नगरकडून जळगाव शहरातकडे दुचाकीने जात असलेल्या दुचाकीला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने चिरडल्याने विवाहितेसह १७ वर्षीय मुलगी दुदैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मानराज पार्कजवळ बुधवारी २८ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली आहे. तर सोबत असलेला तीन वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पायल उर्फ खुशी देवेंद्र जलंकर वय १७ आणि दिक्षिता राहूल पाटील वय २७ दोन्ही रा. द्वारकाई अपार्टमेंट, वाटिकाश्रम जळगाव असे मयत झालेल्या दोघांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील वाटिकाश्रम येथील द्वारकाई अपार्टमेंट येथे पायल जलंकर ही मुलगी परिवारासह वास्तव्याला आहे. याच अपार्टमेंटमध्ये दिक्षिता पाटील या विवाहिता माहेरी आलेल्या होत्या. तसेच या अपार्टमेंटमध्ये राहणारे निलेश पाटील यांना मुलगा झाला होता. त्यामुळे त्या मुलाला पहाण्यासाठी दिक्षिता पाटील या विवाहिता आपल्या तीन वर्षाच्या मुलगा रूद्रा आणि पायल जलंकर यांच्यासोबत बुधवारी २८ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता दुचाकी (एमएच १८ एएस ५३७९ ) ने हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघाल्या होत्या. खोटे नगरकडून जळगाव शहरातकडे दुचाकीने जात असतांना मानराज पार्कजवळील पुलाच्या उतरतीवर मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक देवून दोघांना चिरडले. या अपघात दिक्षिता आणि पायल या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर सोबत असलेला रूद्र हा गंभीर जखमी झाला. ही घटना नजीकच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. दोघांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता.
या घटनेबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिक्षिता पाटील ह्या नाशिक येथील रहिवाशी असून त्यांच्या वडीलांच्या नातेवाईकांचे एकाच निधन झाले होते. त्यामुळे गेल्या १० दिवसांपासून त्या माहेरी वाटिकाश्रम येथे आलेल्या होत्या. तर पायल ही आई वडील व भाऊ यांच्यासोबत वास्तव्याला होती.