चाळीसगाव, प्रतिनिधी | छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या शौर्याच्या बळावर निर्माण केलेले स्वराज्य छत्रपती संभाजी महाराजांनी चारी दिशात पोहोचवले. संभाजी राजे शौर्य, पराक्रम व अलौकिक बुद्धिमत्ता याचे मूर्तीमंत प्रतीक होते. त्यांच्या व्यक्तिमत्वाची उंची मंगेश चव्हाण मित्र परिवारातर्फे आयोजित, अॅड. विनय चंद्रकांत दाभाडे निर्मित, लिखित व दिग्दर्शित शिवसह्याद्री या महानाट्याच्या निमित्ताने चाळीसगावकरांनी अनुभवली. या महानाट्याच्या अनुभूतीने येथील रसिक प्रेक्षक दोन दिवस भारावलेल्या अवस्थेत होते.
शिवसह्याद्री या नाटकाचा पहिला भाग छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ते शिव राज्याभिषेक असा दाखवण्यात आला तर छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मापासून त्यांच्या बलिदानापर्यंत दुसरा भाग दाखवण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. पुष्पहार अर्पण करण्याचा मान उपस्थित प्रेक्षकांमधील वयाने सर्वात ज्येष्ठ असलेल्या दोन व्यक्तींना देण्यात आला. त्यानंतर तुळजा भवानी आईची आरती करण्यात आली. तसेच उपस्थित नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, पत्रकार हे सर्व रंगमंचावर आले. कलाकारांच्या वतीने संभाजी सेनेचे अध्यक्ष लक्ष्मण शिरसाठ यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की,
“छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे गडकिल्ले उभे केले, त्याचप्रमाणे या दोन्ही छत्रपतींनी गड-किल्ल्या सोबत माणसेही उभी केली. त्यांचा आदर्श ठेवत वाटचाल करण्याचा माझा प्रयत्न राहील. महानाट्याला चाळीसगावकरांनी जो उदंड प्रतिसाद दिला, त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभारी आहे. तसेच जे कलाकार स्थानिक आहेत ते माझ्या कुटुंबाचा एक भाग झाले आहेत. त्यांच्या अडीअडचणीच्या वेळी मी सदैव त्यांच्यासोबत राहीन, तसेच या महानाट्याच्या यशस्वीततेसाठी माझा सर्व मित्र परिवार, चाळीसगावमधील सर्व सामाजिक व सांस्कृतिक संस्था, पोलीस प्रशासन, पत्रकार आणि नागरिकांचा मी सदैव ऋणी राहील.”