Home उद्योग एलटीटी-नागपूर व पुणे-नागपूर दरम्यान विशेष गाड्या जाहीर

एलटीटी-नागपूर व पुणे-नागपूर दरम्यान विशेष गाड्या जाहीर


मुंबई -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । उन्हाळी सुट्ट्यांमुळे रेल्वे गाड्यांमध्ये वाढलेली गर्दी लक्षात घेता प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने दिलासादायक निर्णय घेतला आहे. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते नागपूर तसेच पुणे ते नागपूर दरम्यान विशेष गाड्या चालविण्याची घोषणा करण्यात आली असून यामुळे प्रवाशांची गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे नागपूरकडे जाणाऱ्या आणि परतणाऱ्या प्रवाशांना अतिरिक्त सुविधा उपलब्ध होणार आहेत. एलटीटी-नागपूर विशेष गाडी (क्र. ०१०२१) ही ३ एप्रिल रोजी एलटीटी येथून रात्री १२.५५ वाजता सुटून त्याच दिवशी दुपारी ३.४५ वाजता नागपूर येथे पोहोचेल. परतीसाठी नागपूर-एलटीटी विशेष गाडी (क्र. ०१०२२) ही ३ एप्रिल रोजी नागपूर येथून रात्री ८.०० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ११.४५ वाजता एलटीटी येथे पोहोचणार आहे.

या विशेष गाड्यांना ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबे देण्यात आले आहेत. गाडीची संरचना १ वातानुकूलित द्वितीय श्रेणी, ६ वातानुकूलित तृतीय श्रेणी, ९ शयनयान, ४ सामान्य द्वितीय आणि १ गार्ड ब्रेक व्हॅन अशी ठेवण्यात आली आहे.

याशिवाय पुणे-नागपूर दरम्यानही दोन विशेष सेवा जाहीर करण्यात आल्या आहेत. पुणे-नागपूर विशेष गाडी (क्र. ०१४६७) ही ३ एप्रिल रोजी दुपारी ३.५० वाजता पुणे येथून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता नागपूर येथे पोहोचेल. तर नागपूर-पुणे विशेष गाडी (क्र. ०१४६८) ही ४ एप्रिल रोजी सकाळी ८.०० वाजता नागपूर येथून सुटून त्याच दिवशी रात्री ११.३० वाजता पुणे येथे पोहोचणार आहे.

या गाडीला उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. या गाडीची संरचना २ वातानुकूलित द्वितीय, ४ वातानुकूलित तृतीय, ८ शयनयान, ४ सामान्य द्वितीय आणि १ सामान्य श्रेणी अशी आहे.

सध्या उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने या अतिरिक्त गाड्या प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरणार आहेत. विशेषतः नागपूर, जळगाव, भुसावळ मार्गावरील प्रवाशांना या सेवांचा मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे.


Protected Content

Play sound