मुंबई प्रतिनिधी । मी शांत व संयमी असलो याचा अर्थ नामर्द नाही, असे सांगत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दैनिक सामनाला दिलेल्या विस्तृत मुलाखतीतील पहिल्या भागात विरोधकांची जोरदार धुलाई केली आहे.
सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा
सामनाचे कार्यकारी संपादक तथा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची सविस्तर मुलाखत घेतली. यातील भाग हा आजच्या दैनिक सामनात प्रकाशित झाला आहे. यात उध्दव ठाकरे यांची राऊत यांच्या विविध प्रश्नांना बेधडक उत्तरे दिली आहेत. यातील निवडक भाग आपल्यासाठी सादर करत आहोत.
उद्धवजी, हे सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न एक वर्षात पूर्णपणे अपयशी ठरले. सरकार भक्कमपणे उभं आहे. पण आज आपण सरकारचं अभिनंदन करत असताना बाहेर पुन्हा एकदा या सरकारवर दबाव आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत…
– कसला दबाव?
ईडीसारख्या संस्था… ज्या केंद्र सरकारच्या हातात आहेत. त्या संस्थांचा वापर महाविकास आघाडीच्या आमदारांवर धाडी घालून दहशतवाद आणि दडपशाही करताहेत. जेणेकरून आमदारांनी गुडघे टेकावेत.
– मला जेव्हा आव्हान मिळतं तेव्हा मला जास्त स्फूर्ती येते. एक गोष्ट काही लोक विसरतात की, तुम्ही जो म्हणालात तो चमत्कार या महाराष्ट्राच्या मातीत आहे. तेज आहे. महाराष्ट्रावर अनेक संकटं आली. आपत्त्या आल्या. भलेभले अंगावर आले, पण काय झालं?
अंगावर येणाऱयांना शिंगावर घेतलं…
– माझ्या दसऱयाच्या भाषणात मी तेच बोललो होतो. माझ्या आजोबांच्या पहिल्या मेळाव्याच्या भाषणाचा संदर्भ दिला होता की, महाराष्ट्र मेल्या आईचं दूध प्यायलेला नाही. वाघाची अवलाद आहे. महाराष्ट्राच्या वाटेला कुणी जाईल किंबहुना महाराष्ट्राला कोणी डिवचेल तर काय होतं याचे इतिहासात दाखले आहेत. भविष्यात पाहायचे असतील तर पाहायला मिळतील आणि अशी ही संकटं अंगावर घेत पचवून त्यांचा खात्मा करत महाराष्ट्र पुढे जात राहिला, महाराष्ट्र कधी थांबला नाही. महाराष्ट्र कधी थांबणार नाही. कुणी किती आडवे आले तरी त्या आडवे येणाऱयांना आडवं करून महाराष्ट्र पुढे जाईल. म्हणून महाराष्ट्राला आव्हानं देणाऱयांना माझं म्हणणं आहे की, अशी आव्हानं देऊन तुम्ही सूडचक्र करणार असाल तर सूडचक्रात आम्हाला जायची इच्छा नाही. पण तुम्ही तशी वेळ आणलीतच तर तुम्ही आम्हाला म्हणता ना हिंदुत्ववादी तर मग ठीक आहे. सूडचक्र तुमच्याकडे, आमच्याकडे सुदर्शन चक्र आहे. आमच्याकडे पण चक्र आहे. आम्हीही मागे लावू शकतो.
सध्या तर पूर्णपणे उघडपणे आणि निर्लज्जपणे तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. महाराष्ट्रातही अघोरी प्रयोग सुरू झाले आहेत.
– हो. खरं आहे. माझं या सगळय़ा घडामोडींवर लक्ष आहे. मी मागेही म्हटलं होतं की मी शांत आहे, संयमी आहे. पण याचा अर्थ मी काही नामर्द नाही आणि ज्या पद्धतीने आमच्या लोकांच्या कुटुंबीयांवर हल्ले सुरू झाले आहेत ही पद्धत निदान महाराष्ट्राची तरी नाही. नक्कीच नाही. एक संस्पृती आहे. हिंदुत्ववादी म्हटल्यावर एक संस्पृती आहे आणि तुम्ही कुटुंबीयांवर येणार असाल, मुलाबाळांवर येणार असाल तर आमच्या अंगावर येणाऱयांना ज्यांना ज्यांना कुटुंब आणि मुलंबाळं आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की, तुम्हालाही कुटुंब आणि मुलंबाळं आहेत. तुम्ही धुतले तांदूळ नाहीत. तुमची खिचडी कशी शिजवायची ती आम्ही शिजवू शकतो.
या सगळय़ाचा सरकार प्रतिकार करेल?
– सरकार काय, अख्खा महाराष्ट्र करेल. कारण महाराष्ट्रात हा असला विचार कधीच रुजलेला नाहीच. सूडाचा विचार… शत्रूला पराभूत करणं हा आहे. पण या पद्धतीने कारण नसताना… राजकीय शत्रूचा काटा काढणं ही संस्पृती नाही.
पण ईडीचा वापर होतोय. सीबीआयचाही सुरू होता. आता आपण सीबीआयला वेसण घातली…
– का घातली. तुम्ही सीबीआयचा दुरुपयोग करायला लागलात तेव्हा अशी वेसण घालावीच लागते. ईडी काय, सीबीआय काय त्यावर राज्याचा अधिकार नाही? आम्ही देतो ना नावं, आमच्याकडे आहेत नावं. मालमसाला तयार आहे. पूर्ण तयार आहे. पण सूडाने जायचं का? मग जनतेने आपल्याकडून काय अपेक्षा ठेवायची. सूडानेच वागायचं असेल तर तुम्ही एक सूड काढा, आम्ही दहा सूड काढू.
महाराष्ट्र हे देशाला दिशा दाखवणारं, मार्गदर्शन करणारं, प्रेरणा देणारं राज्य आहे. अशा राज्याचं मुख्यमंत्रीपद स्वीकारताना ‘लय भारी’ वाटलं का?
– लय भारी आहे, नक्कीच आहे. पण तसं दडपण माझ्यावर कधी आलं नाही. याचं कारण सत्ता उपभोगली नसली तरी सत्ता जवळून पाहत आलो. शिवसेनाप्रमुखांमुळे पहिल्यापासून हा अनुभव घेत आलो. साधारणतः सत्ता काय असते… हे जवळून पाहत आलो. त्यामुळे दडपण कधी आलं नाही.
तुमच्या जीवनात वर्षभरात काय बदल झाला?
– वर्षभरात एक मोठा बदल झाला तो म्हणजे मी माझ्या शिवसैनिकांपासून अर्थात त्यांच्या भेटींपासून थोडा दुरावलोच. प्रत्यक्ष भेटींचा दुरावा जाणवतोय आणि त्याला कारण केवळ मुख्यमंत्रीपद नाहीय. साहजिकच आहे, कोरोना हे त्याचं एक मुख्य कारण आहे. हे जे काय आपण बिल्ले लावून बसलोय ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ त्यामुळे सगळय़ांच्याच गाठीभेटी या थांबल्या होत्या, पण गेल्या काही दिवसांपासून मी पुन्हा प्रथम माझ्या पदाधिकाऱयांना भेटायला आता सुरुवात केली आहे. हळूहळू आता इतरांनाही भेटेन. जर मी एकदम सगळं उघड केलं, गाठीभेटी उघड सुरू केल्या तर मला त्यांच्याही जिवाची काळजी आहे. कारण ते उत्साहात भेटायला येतात.
हे राज्य नीट चालू नये अशा प्रकारची धोरणं आणि भूमिका केंद्राकडून घेतली जात आहेत. या परिस्थितीत महाराष्ट्र आत्मनिर्भर कधी होणार?
– महाराष्ट्र ठामपणाने एक एक पाऊल पुढे टाकत चालला आहे. केंद्र आणि राज्याविषयी तुम्ही म्हणताय ठीक आहे, पण मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की, माणुसकी मरता कामा नये. ठीक आहे कोणी आज पंतप्रधान असेल. उद्या दुसरा असेल. पुणी आज मुख्यमंत्री आहे. उद्या दुसरा असेल. पण आपण मुळात इथे का बसलो आहे. इकडे पक्षाभेद विसरून तुम्ही काम करणं अपेक्षित आहे. तुम्ही शपथ घेता ना… सर्वांना समान न्याय तुम्ही दिला पाहिजे. तो जर न देता तुम्ही त्याच्यात पक्षपात करत असाल तर मात्र तुम्ही त्या खुर्चीत बसायच्या लायकीचे नाहीत. मग मला असं वाटतं की, या अत्यंत कठीण काळात महाराष्ट्राने जे काही काम केले आहे ते या 28 तारखेला आम्ही जनतेसमोर ठेवतो आहोत. नाही म्हटलं तरी एक पुस्तकच झालेलं आहे.
पण विरोधी पक्षाच्या नेतृत्वाखाली लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करतायेत?
– त्याला मी आंदोलन म्हणत नाही. दुर्दैव आहे. माननीय पंतप्रधानांना काल मी तेच सांगितलं की, हे सगळं जे आपण सांगत आहात, आपल्या मार्गदर्शनाखाली ही लढाई लढतो आहोत, आपण नेतृत्व देत आहात. आम्ही या सगळ्या गोष्टी करत असताना काही राजकीय पक्ष मात्र रस्त्यावरती उतरून सगळे नियम मोडून आदोलनं करताहेत. अशा सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना आपण असंच मार्गदर्शन करावं आणि समज द्यावी.
तुम्ही असं म्हटलं का की, भाजप नेत्यांना एक इंजेक्शन
– असं नाही म्हटलं…
पण एक डोस दिला पाहिजे चांगला विरोधी पक्षाला.
– शेवटी राजकारणालासुद्धा एक सीमा आहे. प्राथमिकता काय आहे तर जनता. त्या जनतेचं आयुष्य, आरोग्य याचं जर का भान तुम्हाला नसेल तर तुम्ही राज्यकर्ते किंवा राजकारणी कसले? पहिली मूलभूत तीच गोष्ट आहे, की जर कुणाला जनतेच्या जिवाची पर्वा नसेल तर तो राजकारणात राहूच कसा शकतो? त्याने राजकारणात राहू नये. कारण अशा लोकांच्या हातात जर का पुन्हा महाराष्ट्र गेला तर महाराष्ट्राचं काय होईल सांगता येत नाही.
आपल्या निमित्तानं मंत्रालयावर भगवा फडकला आहे, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मंत्रालयात जात नाहीत, असा आरोप आहे. कधी जाणार मंत्रालयात?
– महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आतासुद्धा जाऊ शकतात, पण एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो, शेवटी कामं होणं महत्त्वाचं. एका ठिकाणी जाऊन बसणं म्हणजेच सर्व काही नाही. तुम्ही मंत्रालयात जाऊन बसलात आणि केलं काहीच नाही. मी मागेसुद्धा बोललो होतो की, काही न करता फिरणं आणि न फिरता बरंच काही करणं यात फरक आहे. तसंच मंत्रालयामध्येसुद्धा…
मग का जात नाही?
– याचं कारण मी स्वतःच स्वतःवर का थोडीशी बंधन घालतो आहे… कारण मी तुम्हाला सांगतो की, हे करू नका, ते करू नका… आणि मी फिरतोय हे योग्य नव्हे. मी कुठेही जाणं म्हणजे सगळा लवाजमा येणं, गर्दी येणं… आता हळुवार या सगळ्या गोष्टी उघडलेल्या आहेत. कोरोना येण्याआधी माझा महाराष्ट्राचा दौरा सुरू होताच. कोकणात गेलो होतो, विदर्भात तर अधिवेशनच झालेलं आहे. उत्तर महाराष्ट्रही फिरलो आहे… सगळीकडे मी फिरत होतोच. हे काही मला नवीन नाही. मी फिरलो नसतो तर शिवसेना वाढली नसती.
मातोश्रीचं एक पावित्र्य आहे, महत्त्व आहे आणि प्रतिष्ठा आहे. ‘वर्षा’ बंगल्याचा अनुभव काय आहे?
– ध्यानीमनी नसताना हे पूर्वजांच्या पुण्याईने लाभलेलं वैभव आहे. ‘वर्षा’ जे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान आहे… अनेक जण स्वप्न पाहत पाहत बिचारे असेच जातात… आणि मनापासून सांगतो की, मी तिथपर्यंत कसा पोहोचलो हे अजूनही एक प्रश्नचिन्हच आहे, पण ‘वर्षा’ या वास्तूमध्येसुद्धा आपुलकी आणि जिव्हाळ्याचं वातावरण आहे. अनेकदा वास्तूच बोलत असते आपल्याशी काही वेळेला… आणि त्या वास्तूचे आशीर्वादही या सरकारला मिळालेले आहेत. वास्तूचे आशीर्वाद असावेच लागतात… नाहीतर उगाच पुणी गेलं आणि त्या वास्तूचा काहीतरी अनादर केला तर त्या वास्तुदेवतेलाही ते बरं वाटणार नाही. म्हणून हे जे वैभव आहे, त्याचा मी अत्यंत नम्रतेने स्वीकार करून त्या वैभवाचा उपयोग महाराष्ट्राला कसा करता येईल, ते करतो आणि म्हणून मी दिवसभर ‘वर्षा’त माझ्या ऑफिसमध्ये असतो. अनेक महत्त्वाच्या विषयांवर बैठका होतात… अनेक जणांना मी तिथे भेटत असतो. व्हिडीओ का@न्फरन्सेस होतात. त्या फिरणाऱया लोकांना कळत नाही, पण मी एका जागी बसून अनेक महत्त्वाचे निर्णय घेत असतो आणि एकाग्रतेने ते निर्णय मला तिथे घेता येतात.
राज्याच्या जनतेला आजच्या दिवशी तुम्ही काय संदेश द्याल?
– मी हाच संदेश देईन की, थोडा काळ अजून कठीण आहे… नक्की आहे. ज्या जिद्दीने, धैर्याने आणि विश्वासाने तुम्ही त्याचा सामना करीत आहात आणि विशेष म्हणजे या मंत्रिमंडळावर तुमचे जे काही आशीर्वाद आहेत, प्रेम आहे ते तसेच राहू द्या… जेव्हा जेव्हा मी त्यांच्याशी ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून संवाद साधतो, तेव्हा मला प्रतिक्रिया येतात की, आम्हाला आमच्या घरातलं कोणीतरी बोलतंय असं वाटतं. हे नातं असंच कायम ठेवा. कारण मुख्यमंत्रीपद येतं जातं… पण हे जे नातं आहे, हे जे प्रेम आहे हे सगळ्यांच्या भाग्यात नसतं. पण त्या प्रेमाचा मी भुकेला आहे. हे जे नातं आणि ही जी नाळ आहे ही अशीच कायम ठेवा आणि तुमच्या आशीर्वादाच्या, विश्वासाच्या जोरावर तुमच्या मनातला महाराष्ट्र घडवण्याचा आटोकाट प्रयत्न केल्याशिवाय मी राहणार नाही.