जळगावातील पाच अपहारांच्या चौकशीसाठी विशेष पथक!

जळगाव प्रतिनिधी । वाघूरसह पाच योजनांमधील अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक गठित करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

याबाबत वृत्त असे की, नरेंद्र पाटील यांनी वाघूर पाणीपुरवठा योजना, अटलांटा, विमानतळ योजना, जिल्हा बँक व आयबीपी घोटाळा या पाच प्रकरणांतील अपहारप्रकरणी जळगाव शहर पोलिस ठाणे येथे दोन तर जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तीन अशा एकूण पाच तक्रारी दाखल केल्या होत्या. सन २०१२ मध्ये सुमारे ७०० कोटींचा अपहार झाल्याबाबत पाच गुन्हे दाखल झाले. या गुन्ह्यांच्या तपासात प्रगती होत नसल्यामुळे पाटील यांनी २०१५ मध्ये औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. नरेंद्र पाटील यांच्या निधनानंतर त्यांचे बंधू विजय पाटील व मित्र आरिफ शेख यांनी या याचिकेत सहभागी होण्याची विनंती केली. ती खंडपीठाने मंजूर केली. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. शैलेश ब्रम्हे यांनी युक्तिवाद केला. त्यांना अ‍ॅड. ए. आर. सैयद यांनी सहकार्य केले. सरकारतर्फे अ‍ॅड. अमरजितसिंह गिरासे व अ‍ॅड. सिद्धार्थ यावलकर यांनी काम पाहिले.

या प्रकरणाच्या चौकशीसाठी न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक गठित करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. सर्वात महत्वाचे म्हणजे ही संपूर्ण प्रक्रिया तीन आठवड्यांत करण्याचेही निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

Add Comment

Protected Content