जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या वतीने जनजागृतीसाठी एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दि. ११ जुलै २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजता बालविश्व प्राथमिक शाळा, जळगाव येथे हा कार्यक्रम पार पडला. हा उपक्रम महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार व मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशान्वये तसेच सचिव पवन एच. बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत झाली. सचिव पवन एच. बनसोड यांनी मुलांच्या अधिकारांबाबत सखोल माहिती दिली. अॅड. एम. आर. भोकरीकर यांनी शिक्षणाचा हक्क व त्याचे सामाजिक महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन केले. अॅड. शिल्पा व्ही. रावेरकर यांनी “बेटी बचाओ, बेटी पढाओ” या मोहिमेचे महत्त्व सांगत मुलींच्या शिक्षणावर भर दिला. ज्येष्ठ वकिल टि. एन. बोरले यांनी ‘बाल न्याय’ विषयावर विद्यार्थ्यांना समजेल अशा पद्धतीने माहिती दिली, तर संस्थापिका भारती चौधरी व संचालक सौरभ चौधरी यांनी आपल्या अनुभवातून मुलांच्या विकासात कायदेशीर जागृतीचे स्थान स्पष्ट केले.

या कार्यक्रमात “लैंगिक अत्याचारांपासून बालकांचे संरक्षण कायदा (POCSO Act)” यासारख्या गंभीर विषयांवरही चर्चा करण्यात आली. विधी सेवा प्राधिकरणाच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयी जागरूकता निर्माण झाली. सूत्रसंचालन श्रीमती प्रियंका पवार यांनी तर आभार प्रदर्शन आबा तळेले यांनी केले. कार्यक्रमाला बालविश्व प्राथमिक शाळेचे सर्व प्रशासकीय अधिकारी, शिक्षकवृंद, कर्मचारी, सहकारी, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन होण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे संतोष एस. तायडे व मनोज डी. साळुंखे यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या सहकार्यामुळे संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पडला.



