Home Cities जळगाव  गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयमध्ये ‘स्पार्क 2026’ उत्साहात

 गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयमध्ये ‘स्पार्क 2026’ उत्साहात


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगावातील गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालय येथे सलग पाच दिवसांपासून सुरू असलेला ‘स्पार्क 2026’ हा बहुआयामी कार्यक्रम २५ फेब्रुवारी २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा, व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणारा आणि करिअर मार्गदर्शन करणारा हा महोत्सव विविध उपक्रमांनी रंगला.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अनिल पी. डोंगरे (डीन, फॅकल्टी ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट, एनएमयू), भावना शर्मा (डिजिटल मीडिया इंटरप्रेनॉर), डॉ. केतकी पाटील (गोदावरी फाउंडेशन) आणि डॉ. प्रशांत वारके (संचालक) उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात पाहुण्यांचे स्वागत केले.

भावना शर्मा यांनी डिजिटल मार्केटिंगच्या युगात विद्यार्थ्यांसमोर अमर्याद संधी उपलब्ध असल्याचे सांगितले. “मोबाईल फोनपासूनही तुम्ही करिअरची सुरुवात करू शकता. शिक्षणासाठी पुणे-मुंबईलाच जावे लागते असे नाही; छोट्या शहरातूनही मोठी स्वप्ने पूर्ण होऊ शकतात. शिक्षणाला वयाची अट नसते, सातत्याने शिकत राहणे महत्त्वाचे आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य संचारले.

डॉ. अनिल डोंगरे यांनी यशासाठी जिद्द आणि सातत्य आवश्यक असल्याचे अधोरेखित केले. आजच्या काळात विविध क्षेत्रांत नोकरीच्या मोठ्या संधी उपलब्ध असून ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीसारख्या नव्या तंत्रज्ञानाकडे विद्यार्थ्यांनी वळावे, असे त्यांनी सांगितले. “टेक्नॉलॉजी इतकी प्रगत झाली आहे की ड्रायव्हरलेस कार शक्य झाली आहे; गरज आहे ती स्वतःला अपस्किल करण्याची,” असे ते म्हणाले.

डॉ. केतकी पाटील यांनी विद्यार्थ्यांना अशा उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. “तुमच्यातील गुण ओळखा आणि त्यात पारंगत व्हा. स्वतःला सतत अपडेट ठेवा, संस्कृती जोपासा आणि समस्या संवादातून सोडवा,” असा संदेश त्यांनी दिला. पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांचे त्यांनी विशेष अभिनंदन केले.

डॉ. प्रशांत वारके यांनी स्टेज डेरिंग आणि परफॉर्मन्स कौशल्ये भविष्यातील कॉर्पोरेट आयुष्यात उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले. “तुमचा सहभागच तुमची ओळख निर्माण करतो,” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केले. ‘वादे तुट जाते है, कोशिशें कामयाब होती है’ हा संदेश देत त्यांनी चिकाटीचे महत्त्व पटवून दिले.

‘स्पार्क 2026’ अंतर्गत प्रोफेशनल डे (स्पोर्ट्स डे), मिस मॅच डे, किड्स डे, रांगोळी, चॉकलेट डे, मेहंदी, ट्रॅडिशनल डे, प्रेस कॉन्फरन्स, सोशल अॅक्टिव्हिटी, कल्चरल डे, डान्स, सिंगिंग आणि ड्रामा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विविध स्पर्धांमधील विजेत्यांना पारितोषिके व प्रमाणपत्रे देण्यात आली. यंदाचा ‘मिस्टर स्पार्क’ किताब महेश वानरे (बीसीए) तर ‘मिस स्पार्क’ किताब योगिनी पाटील (एमसीए) यांनी पटकावला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. चारुशीला चौधरी यांनी केले.


Protected Content

Play sound