सोयगाव प्रतिनिधी । देशाला स्वातंत्र्य मिळून ७२ वर्ष होवूनही सोयगाव तालुक्यातील २२ गावांमध्ये अद्यापही परिवहनची लालपरी पोहचली नसल्याने स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला या २२ गावातील वृद्धांनी खंत व्यक्त केली आहे.
माजी केंद्रीयमंत्री कै.(अप्पासाहेब)बाबूरावजी काळे यांनी स्वातंत्र्यानंतर आदिवासी सोयगावला तालुका करण्याची मागणी लावून धरली असतांना सोयगावला परिवहनच्या बसचे आगार व्हावे हि मागणीही त्यांनी लावून धरली होती. त्यामुळे २० वर्षापूर्वी सोयगावला आगार झाले असतांनाही तब्बल २२ गावात परिवहनच्या बससेवेची सुविधा पोहचली नसल्याने या २२ गावातील अनेक वृद्धांनी अद्यापही गावात बस आल्याचे उघड्या डोळ्यांनी पाहिलेले नसल्याने ७२ व्या स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला खंत व्यक्त केली आहे.दरम्यान स्वातंत्र्यानंतर सोयगावला तालुक्याचा दर्जा मिळाला, त्यानंतर हळूहळू शासनाच्या सुविधा सोयगावला पोहचल्या,परंतु परिवहन ची लाल परी मात्र अद्यापही २२ गावात न पोहचल्याने अनेकांची हयात पायी प्रवासात गेली आहे. यामध्ये सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या गोंदेगावचा समावेश असून या गावात अद्यापही सोयगाव आगाराची बससेवा पोहचलेली नाही. त्याचप्रमाणे सावळदबारा भागातील १२ खेड्यापैकी तब्बल आठ गावात बससेवा गेलेली नसून बनोटी भागातील अनेक गावांची हीच अवस्था असल्याने सोयगाव आगाराच्या स्थानिक बसफेऱ्या कमी असल्याने सोयगाव तालुक्यातील २२ गावात बस न गेल्याने या गावातील ग्रामस्थांचं नशिबी अजूनही पायी प्रवास जडलेला आहे.
दरम्यान या २२ गावांपैकी १० गावातील विद्यार्थी बाहेरगावी शिक्षणासाठी जात असल्याने वरठाण, पळाशी, वाडी, माळेगाव, पिंप्री, दस्तापूर, रावेरी, चारूतांडा, उपल खेडा यासह अनेक गावातील विद्यार्थ्यांना पायी प्रवास करून शाळा गाठावी लागत आहे. गोंदेगावला मात्र पाचोरा, चाळीसगाव आगाराच्या बसेस स्पर्श करून जातात. दरम्यान परिवहनची बससेवा गावात न पोहचलेल्या २२ गावातील वृद्धांची हाडे पायी प्रवासाने मोडकळीस आली असून पायी प्रवास करून या वृद्धांनी आता अंथरून धरले आहे.
आदिवासी काळदरीचं ग्रामस्थांनी अजूनही बस पहिली नाही
शासनाच्या परिवहनची लालपरी बस अद्यापही आदिवासी काळदरीचं ग्रामस्थांना माहित नसल्याचे खळबळजनक माहिती आदिवासींनी दिली आहे.त्यामुळे एकीकडे आधुनिकतेकडे जात असलेली शासनाला अद्यापही या आदिवासी गावाला बस सोडण्यासाठी जाग आलेली नाही.
चौकट
या आधी सोयगाव-चाळीसगाव राज्यमार्गाच्या दुर्दशेने त्रस्त झालेल्या ग्रामस्थांची मागील वर्षापासून नुकतीच सुटका झाली आहे.या रस्त्यावर काही भागात सार्वजनिक विभागाकडून रस्त्याचे काम करण्यात आले असल्याने रस्त्याचे सुख मिळाले परंतु आता या रस्त्यावर धावणारी बस केव्हा येईल हीच प्रतीक्षा लागून आहे.