अमरावती-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एअर इंडियाच्या सहकार्याने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) अमरावतीच्या बेलोरा विमानतळावर दक्षिण आशियातील सर्वात मोठी उड्डाण प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. एमएडीसीने जागतिक दर्जाच्या विमान उड्डाण पायाभूत सुविधांनी सुसज्ज अमरावती विमानतळावर एअर इंडिया एप्रिल-मे २०२५ पर्यंत उड्डाण ऑपरेशनसह प्रकल्प पूर्णतः कार्यान्वित करण्याची शक्यता आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालकांच्या वतीने परवानाकृत उड्डाण प्रशिक्षण संस्था (फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन) ही भारतातील कोणत्याही विमान कंपनीने स्थापन केलेली पहिली संस्था राहणार आहे.
या सहयोगी उपक्रमासाठी एअर इंडिया आणि एमएडीसी यांच्यात एक सामंजस्य करारावर नुकतीच स्वाक्षरी करण्यात आली. एअर इंडियाचे संचालक सुनील भास्करन, एअर इंडियाच्या एव्हिएशन अकादमी यांच्या नेतृत्वाखालील एक चमू अमरावतीमध्ये या प्रकल्पाच्या भूस्तरीय योजनांचे रेखाटन करत आहे. एअर इंडिया ३१ सिंगल इंजिन आणि तीन ट्विन इंजिन विमानांद्वारे दरवर्षी १८० व्यावसायिक वैमानिकांना प्रशिक्षण देणार आहे. दरवर्षी ३६ हजार फ्लाइट तासाची क्षमता या ठिकाणी आहे. विद्यार्थ्यांसाठी १० एकर जमिनीवर अत्याधुनिक प्रशिक्षण संस्था विकसित करण्यात येणार आहे, ज्यामध्ये डिजिटल-सक्षम वर्ग, जागतिक शैक्षणिक मानकांसह सुसज्ज वसतिगृहे, एक डिजिटल ऑपरेशन सेंटर आणि ऑपरेशनल कार्यक्षमता वाढविण्यासाठी स्वतःची देखभाल सुविधा उपलब्ध असणार आहे. उड्डाण प्रशिक्षण संस्थेच्या सर्वसमावेशक प्रशिक्षण अभ्यासक्रमात सैद्धांतिक वर्ग, तसेच गतिमान व्यावहारिक उड्डाण अनुभवाचा समावेश असणार आहे. येथे देशातील तरुणांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण मिळेल.