कोलकाता वृत्तसंस्था । टिम इंडियाचा माजी कर्णधार तथा बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता असून त्यांच्या संस्थेला पश्चिम बंगाल सरकारने दिलेली जमीन परत केल्याने या चर्चेला पुन्हा एकदा वेग आला आहे.
पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. बंगाल भाजप मुख्यमंत्रीपदासाठी लोकप्रिय चेहर्याच्या शोधात आहे. अशातच बीसीसीआयचे अध्यक्ष आणि टीम इंडियाचे माजी कर्णधार सौरभ गांगुली भाजपमध्ये प्रवेश करण्याची अटकळ बांधली जात आहे.
ममता सरकारने बंगालच्या न्यू टाऊनमध्ये आयसीएससी बोर्डाच्या बारावीपर्यंतच्या शाळेसाठी सौरभ गांगुली यांना जमीन दिली होती. परंतु नुकतंच त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली आणि शाळेसाठी दिलेली दोन एकर जमीन परत केली.
सौरभ गांगुली यांनी आपली राजकीय भूमिका अद्यप स्पष्ट केलेली नाही. त्यांचे सर्वपक्षीय हितसंबंध आहेत. विशेष करून ममता बॅनर्जी यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहे. सौरभ गांगुली यांना क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे अध्यक्ष बनवण्यामागे ममता बॅनर्जी यांची मदत असल्याची चर्चा रंगली होती.
यानंतर ऑक्टोबर २०१९ मध्ये सौरभ गांगुली यांना बीसीसीआयचे अध्यक्ष बनवण्यात गृहमंत्री अमित शाह यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. तेव्हापासूनच २०२१ मध्ये पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत सौरभ गांगुली भाजपचं नेतृत्त्व करु शकतो, अशी शक्यता बळावली आहे. यातच आता ताज्या घडामोडींमुळे या चर्चेला वेग आला आहे.