नवी दिल्ली वृत्तसंस्था । तिन्ही सैन्य दलांमध्ये समन्वय साधण्यासाठी ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टॉफ’ या महत्वाच्या पदाची नियुक्ती केली जाणार असल्याची घोषणा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. ते स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करत होते.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. यात त्यांनी अनेक मुद्यांना स्पर्श केला. याप्रसंगी ते म्हणाले की, अनेकांनी कलम ३७० रद्द करण्यासाठी पाठिंबा दिला. परंतु काही लोक राजकारण करण्यासाठी याला विरोध करत आहेत. माझ्यासाठी देशाचं हितच सर्वकाही आहे. त्यामुळे ७० वर्षात जे काम झाले नाही ते १० दिवसात केले. संरक्षणाच्या मुद्यावरही त्यांनी यावेळी भर दिला. तिन्ही संरक्षण दले देशाचा अभिमान आहे. देशाच्या संरक्षणाच्या दृष्टिने तिन्ही दलांमध्ये समन्वयाची गरज आहे. यामुळे देशाच्या तिन्ही दलांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी सरकार ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ या पदाची नियुक्ती करणार आहे. या पदावरील व्यक्ती तिन्ही दलांचे नेतृत्व करेल, असे मोदी म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, आम्ही महागाई नियंत्रणात आणली, तसेच विकासदरदेखील कायम ठेवला आहे. संपत्ती निर्मिती देशाच्या विकासासाठी आवश्यक आहे. त्याचप्रमाणे संपत्ती निर्मिती करणारेदेखील या देशाची संपत्ती आहेत. सरकारी कामे लवकरात लवकर व्हावी यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.