Home मनोरंजन तिहार तुरुंगातील या अभिनेत्याच्या मदतीला धावला सोनू सूद

तिहार तुरुंगातील या अभिनेत्याच्या मदतीला धावला सोनू सूद


 दिल्ली-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता राजपाल यादव आज मात्र आयुष्यातील अत्यंत कठीण टप्प्यावर उभा आहे. चेक बाऊन्स प्रकरणात दिल्लीतल्या तिहार तुरुंगात आत्मसमर्पण करताना “माझ्याकडे पैसे नाहीत, मी एकटा पडलोय” असे म्हणत तो भावूक झाला, आणि त्याच क्षणी अभिनेता सोनू सूद त्याच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे.

चेक बाऊन्स प्रकरणी राजपाल यादवने न्यायालयाच्या आदेशानुसार तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केले. आत्मसमर्पणापूर्वी तुरुंगातील अधिकाऱ्यांसमोर तो भावनाविवश झाला होता. आयुष्यातील चढउतार, अपयशी ठरलेला चित्रपट आणि आर्थिक अडचणी यामुळे तो पूर्णपणे कोलमडल्याचे त्याच्या शब्दांतून स्पष्ट झाले. “माझ्याकडे कोणताही मार्ग उरलेला नाही,” असे तो म्हणताच उपस्थितांचेही मन हेलावले.

या संकटकाळात अभिनेता सोनू सूद राजपालच्या पाठीशी उभा राहिला आहे. सोनू सूदने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहीत संपूर्ण चित्रपटसृष्टीला राजपालच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. राजपाल यादव हा अत्यंत प्रतिभावान कलाकार असून, त्याने हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक वर्षे अविस्मरणीय योगदान दिल्याचे सोनू सूदने नमूद केले आहे. कधी कधी आयुष्य प्रतिभेमुळे नाही तर वेळेच्या क्रौर्यामुळे कठीण बनते, असेही त्याने स्पष्टपणे लिहिले आहे.

सोनू सूदने आपल्या पोस्टमध्ये सांगितले की, राजपाल त्याच्या आगामी चित्रपटाचा भाग असणार असून त्या चित्रपटाची साइनिंग अमाऊंट त्याने मदत म्हणून दिली आहे. ही रक्कम दान नसून भविष्यातील कामाच्या बदल्यात दिलेला सन्मान असल्याचे त्याने ठामपणे नमूद केले. जेव्हा इंडस्ट्रीतील एखादा कलाकार कठीण काळातून जात असतो, तेव्हा त्याला तो एकटा नाही, याची जाणीव करून देणे ही संपूर्ण इंडस्ट्रीची जबाबदारी असल्याचेही सोनू सूदने म्हटले आहे.

राजपाल यादवचे हे प्रकरण 2010 पासून सुरू आहे. ‘अता पता लापता’ या चित्रपटासाठी त्याने मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडकडून पाच कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला आणि राजपालला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. परिणामी त्याला कर्जाची परतफेड करता आली नाही आणि दिलेले चेक बाऊन्स झाले. अखेर हे प्रकरण न्यायालयात गेले.

2018 मध्ये दिल्लीतल्या दंडाधिकारी न्यायालयाने राजपाल यादव आणि त्याच्या पत्नीला चेक बाऊन्स प्रकरणात दोषी ठरवत सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. 2019 मध्ये सत्र न्यायालयानेही हा निर्णय कायम ठेवला. त्यानंतर राजपालने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. जून 2024 मध्ये उच्च न्यायालयाने सौहार्दपूर्ण तोडगा काढण्याचे निर्देश देत त्याची शिक्षा तात्पुरती स्थगित केली होती. मात्र ठरलेल्या अटींनुसार रक्कम न भरल्याने अखेर 2 फेब्रुवारी 2026 रोजी न्यायालयाने आत्मसमर्पणाचे आदेश दिले.


Protected Content

Play sound