नवी दिल्ली । काँग्रेसमध्ये नेतृत्वावरून प्रचंड उलथापालथी होत असतांना हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी याच या पदावर राहणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. पुढील निर्णय होईपर्यंत त्यांच्या कडेच अध्यक्षपद राहणार आहे.
आज काँग्रेस कार्यकारिणीची महत्वाची बैठक झाली. यात सोनिया गांधी यांना पत्र लिहिणार्या २३ नेत्यांवर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी नाराजी आजच्या कार्यकारिणीच्या बैठकीतून बोलून दाखविली आहे. इच्छा नसतानाही सोनिया गांधी काँग्रेसचं हंगामी अध्यक्षपद स्वीकारलं. त्या रुग्णालयात असताना प्रश्न उपस्थित करणं किती योग्य आहे?, अशा कठोर शब्दात राहुल गांधी यांनी सवाल विचारले. या पत्रामुळे २३ नेते भाजपसोबत एकप्रकारे हातमिळवणी करत असल्याचंही राहुल गांधी म्हणाले.
दरम्यान, राहुल गांधी यांनी प्रश्न विचारल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी थेट ट्वीट करुनच त्यांना उत्तर दिलं. तर भाजपशी हातमिळवणी करत असल्याचा आरोप सिद्ध झाला तर राजीनामा देईन, असा पवित्रा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी घेतला आहे. या सर्व गदारोळात कपिल सिब्बल यांच्या ट्वीटला काँग्रसेचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी उत्तर दिलं.
यानंतर जवळपास सात तास बैठक झाल्यानंतर सोनिया गांधी याच पक्षाच्या हंगामी अध्यक्षा म्हणून कायम राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.