चाळीसगाव (प्रतिनिधी)। महाराष्ट्र राज्य भारतीय मीडिया फाऊंडेशनच्या वतीने आयोजित ओबीसी फाऊंडेशन इंडिया अंतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त राणरागीनी नॅशनल आवार्ड या पुरस्काराने सोनल पंडीत साळुंखे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सिनेअभिनेत्री निशींगधा वाड, लावणी साम्राज्ञी प्रियंका शेट्टी, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला. हा कार्यक्रम पुण्यातील कोथरूड येथील कानिफनाथ मंगल कार्यालयात पार पडला.
उल्लेखनिय कार्य केल्याने केली निवड
सोनल साळुंखे यांनी लहानपणी राष्ट्र सेवादलाच्या माध्यमातून सामाजिक कामांची आवड निर्माण झाली. गेल्या १४ वर्षापासून त्या हरिभाऊ चव्हाण प्राथमिक आश्रमशाळा लोणजे येथे शिक्षिका म्हणून तांड्या वस्तीवरील दुर्लक्षित मुलांसाठी ज्ञानदानाच कार्य करत आहेत. एक उपक्रमशील शिक्षिका म्हणून त्यांच्या कामाचा ठसा तेथेही त्यांनी पाडला. गेल्या ३ वर्षांपासून त्यांनी जिजाऊ समितीची स्थापना करून त्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, हिवाळ्यात गरजूंना ब्लॅंकेट वाटप, महिला व मुलींच्या आरोग्याविषयी माहितीपर वेगवेगळी नामांकित डॉक्टरांची व्याख्याने व शिबीरे तसेच नियमित योग वर्ग आयोजित करत असतात. दर १२ जानेवारीला जिजाऊ समिती मार्फत सुंदर असे जिजाऊ मिरवणूक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. समिती मार्फत नेत्र तपासणी शिबीर, मोफत चष्मे वाटप गरजूंचे मोफत ऑपरेशन इत्यादी उपक्रम त्या समिती मार्फत राबवत असतात. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याने चाळीसगाव तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.