भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रिटायरमेंटच्या रकमेतून दोन लाख रुपये न दिल्याच्या रागातून मुलाने सेवानिवृत्त असलेल्या बापाला लाकूड डोक्यात मारून गंभीर दुखापत केल्याची धक्कादायक घटना गुरुवार ६ मार्च रोजी दुपारी २.३० वाजता घडली आहे. या संदर्भात पित्याने दिलेल्या फिर्यादीवरून रात्री ९ वाजता मुलावर भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे दिलीप गणपत महाजन वय-६२ हे वृद्ध आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान त्यांचा मुलगा हेमंत दिलीप महाजन याने गावातच घराचे बांधकाम सुरू केले आहे. त्यावेळी हेमंत महाजन यांनी त्यांचे वडील दिलीप गणपत महाजन यांना रिटायरमेंटच्या रकमेतून २ लाख रुपये मागितले. त्यावेळी दिलीप महाजन यांनी पैसे दिले नाही. या रागातून मुलगा हेमंत महाजन यांनी लाकूड हातात घेऊन वडील दिलीप महाजन यांच्या डोक्यात मारून दुखापत केली. दरम्यान या घटनेसंदर्भात दिलीप महाजन यांनी रात्री ९ वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार हेमंत दिलीप महाजन रा.कंडारी ता. भुसावळ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल विकास बाविस्कर करीत आहे.