नवी दिल्ली (वृत्तसंस्था) काही लोकांना हा देश आणि कोर्ट पैशाच्या बळावर चालवायचा आहे. हे कोर्ट राजकीय ताकद आणि पैशाच्या बळावर चालवता येणार नाही. त्यामुळे न्याय प्रक्रियेत हस्तक्षेप करू नका, असे सांगतानाच आगीशी खेळू नका. आता गप्प न बसण्याची वेळ आली आहे, असा इशारा सरन्यायाधीशांविरोधातील लैंगिक शोषणाची तक्रारीची सुनवाई सुरु असतांना न्यायाधीश अरुण मिश्रा यांनी दिला आहे. एवढेच नव्हे तर, या कटाची पाळेमुळे खणून काढू, असे त्रिसदस्यीय पीठाने स्पष्ट केले आहे.
सरन्यायाधीशांविरोधातील लैंगिक शोषणाची तक्रारीची सुनवाई सुरु असतांना न्या. मिश्रा यांनी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना संबोधित करताना गंभीर इशारा दिला आहे. जेव्हा बड्या लोकांसंदर्भातील एखादा खटला येतो आणि त्यावर सुनावणी सुरू होते, तेव्हा आम्हाला पत्र पाठवली जातात. आम्ही कोर्ट चालवू शकतो, असे या पॉवरफुल लोकांना वाटते, असेही मिश्रा म्हणाले. गेल्या तीन-चार वर्षात सर्वोच्च न्यायालयात जे चालले आहे, ज्या प्रकारे आरोप करण्यात येत आहे, ते पाहता ही संस्थाच संपुष्टात येईल. याआधी झालेल्या सुनावणीदरम्यान तीन न्यायाधीशांचे खंडपीठ चांगलेच संतापलेलं पहायला मिळाले. सुनावणी करत असलेल्या न्यायाधीश अरुण मिश्रा, आर एफ नरीमन आणि दीपक गुप्ता यांनी आपण नेहमीच फिक्सिंग होत असल्याचे ऐकत असून कोणत्याही परिस्थितीत हे बंद झाले पाहिजे असेही म्हटले आहे. दरम्यान, वकील उत्सव सिंग बैंस यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात दावा केला आहे की, सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याविरोधात लैंगिक शोषणाची तक्रार मोठ्या कटाचा भाग आहे. याप्रकरणी आपल्याकडे ठोस पुरावे असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.