मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानासह सात ठिकाणी ईडीने छापेमारी केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी त्यांची अटक अटळ असल्याचे सूचकपणे व्यक्त केले आहे.
राज्याचे परिवहन मंत्री तथा शिवसेना नेते अनिल परब यांच्या घरासह त्यांच्याशी संबंधीत असणार्या ठिकाणांवर आज सकाळपासून ईडीने छापेमारी सुरू केली आहे. यात नेमके काय मिळाले याचे तपशील समोर आला नसला तरी ईडीने परब यांच्या विरोधात मनी लॉंड्रींगच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, परब यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी त्यांना खिजवणारी प्रतिक्रिया दिली आहे. या संदर्भात एका वाहिनीशी बोलतांना परब म्हणाले की, सचिन वाझेने १०० कोटींच्या वसुलीत अनिल परब यांचं नाव घेतलं होतं. , पोलीस बदल्यांमध्ये त्यांचं नाव आलं होतं. त्याआधी एका प्रकरणात ईडी चौकशी करत होती. तसंच लॉकडाऊन असताना अनिल परब यांनी २०-२१ मध्ये दापोलीत अनधिकृत रिसॉर्ट बांधलं. त्यानंतर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने दापोली कोर्टात फौजदारी खटला दाखल केला. परब यांनी शेकडो कोटींचे गैरव्यवहार केला आहे. आयकर विभागाचे छापे पडले तेव्हा अनिल परब यांचे पार्टनर संजय कदम यांच्या घरात साडेतीन कोटी रुपये रोख सापडले. या सगळ्याचं कारवाईमध्ये रुपांतर झालं आहे.
ते पुढे म्हणाले की, फौजदारी खटला भारत सरकारने दाखल केला आहे. फसवणुकीची कारवाई ठाकरे सरकारने केली. उद्धव ठाकरेंनी अशा पद्धतीने अनिल परब यांचा काटा काढला. फसवणुकीच्या ऑर्डरवर आदित्य ठाकरे यांनी स्वाक्षरी केली आहे. म्हणून मी आताचं ठाकरे कुटुंब माफिया आहे, असं मी म्हणतो. सगळ्यात पहिली माहिती ठाकरे कुटुंबाला कळते, कारण ते घोटाळे करतात. तर अनिल परब यांनी सुटकेस भरून ठेवावी असे देखील त्यांनी खोचकपणे सुचविले आहे.