जळगाव, प्रतिनिधी | अनोख्या आणि दुर्मिळ अशा कंकणाकृती सूर्यग्रहणाचा नजरा उद्या (दि.२६) भारतातून दिसणार आहे. केवळ ११८ कि.मी.च्या पट्ट्यातून हे कंकणाकृती ग्रहण दिसणार आहे. हा पट्टा कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यातून जाणार आहे. हे ग्रहण महाराष्ट्र आणि जळगावातून खंडग्रास दिसणार असून सुमारे ६८ टक्के सूर्य यावेळी ग्रासित दिसणार आहे.
जळगावात सकाळी ८.०७ मिनिटांनी सुरुवात होणार असून ९.२५ मिनिटांनी ग्रहणाचा मध्य होणार असून त्यावेळी सूर्य ६८.२ टक्के ग्रासित झालेला असेल. त्यानंतर ग्रहण हळूहळू सुटत जावून ११.०० वाजता ग्रहण पूर्णपणे संपेल. एकूण दोन तास ५२ मिनिटे हा ग्रहणाचा कालावधी असेल.
मू.जे. महाविद्यालयात सुविधा :- शहरातील मू.जे. महाविद्यालयात भूगोल विभाग आणि जळगाव खगोल गृपतर्फे सकाळी ७.३० वाजेपासून भूगोल विभागाच्या छतावर १२ इंचाच्या दुर्बिणीतून सोलर फिल्टरद्वारे हे ग्रहण पाहण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली असून कुठलाही गैरसमज न बाळगता शहर व परिसरातील सर्व खगोलप्रेमींनी या दुर्मिळ खगोलीय घटनेचा आनंद घ्यावा, असे आवाहन भूगोल विभागप्रमुख प्रा.प्रज्ञा जंगले व खगोल अभ्यासक अमोघ जोशी यांनी केले आहे.