Home क्राईम सॉफ्टवेअर इंजिनिअर, अभिनेत्याचा करूण अंत; उंदिरखेडे गावावर शोककळा !

सॉफ्टवेअर इंजिनिअर, अभिनेत्याचा करूण अंत; उंदिरखेडे गावावर शोककळा !


पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील उंदिरखेडे येथे एका २५ वर्षीय होतकरू तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. सचिन गणेश चांदवडे (वय २५) असे मृत तरुणाचे नाव असून, तो सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत होता. या दुर्दैवी घटनेमुळे उंदिरखेडे गावावर आणि संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे.

ही घटना २३ ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. सचिन हा पुणे येथील एका प्रतिष्ठित आयटी पार्कमध्ये नोकरीस होता. त्याने राहत्या घराच्या वरील मजल्यावरील खोलीत पंख्याला गळफास लावून घेतला. हा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने सचिनला खाली उतरवून उपचारासाठी प्रथम खासगी रुग्णालयात दाखल केले.

मात्र, त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला अधिक उपचारासाठी धुळे येथे हलवण्यात आले. दुर्दैवाने, २४ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्याची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. अभिनयाची होती आवड: सचिन हा केवळ सॉफ्टवेअर इंजिनिअरच नव्हता, तर त्याला लहानपणापासूनच अभिनयाची प्रचंड आवड होती. त्याने आपली ही आवड जोपासत मुंबई आणि पुणे येथील सिनेसृष्टीतही अभिनयाचे काम केले होते. एका तरुण, हुशार आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या अशा अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

सचिनच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.


Protected Content

Play sound