Home क्रीडा धनाजी नाना महाविद्यालयात सॉफ्टबॉल स्पर्धेचे आयोजन

धनाजी नाना महाविद्यालयात सॉफ्टबॉल स्पर्धेचे आयोजन


फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत जळगाव विभागातील सॉफ्टबॉल आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा २०२५-२६ चे यशस्वी आयोजन फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयात उत्साहात पार पडले. क्रीडाविश्वात करिअरच्या संधी वाढत असताना विद्यार्थ्यांमध्ये क्रीडासंस्कृती रुजवणारी ही स्पर्धा खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरली.

या स्पर्धांमध्ये पुरुष व महिला गटांचा समावेश करण्यात आला होता. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे होते, तर उद्घाटक म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील आंतरविद्याशाखा अधिष्ठाता प्रा. डॉ. साहेबराव भुकन उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून अधिसभा सदस्य प्रा. डॉ. पदमाकर पाटील तर विशेष अतिथी म्हणून सॉफ्टबॉल खेळातील छत्रपती पुरस्कारप्राप्त श्री किशोर चौधरी यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

या स्पर्धेसाठी संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी उपप्राचार्य प्रा. डॉ. हरीश नेमाडे, जिमखाना समितीचे चेअरमन डॉ. ए. के. पाटील, जळगाव विभागाचे सचिव प्रा. सुभाष वानखेडे, प्रा. डॉ. गोविंद मारतळे, डॉ. मुकेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते. जळगाव विभागातील सहा पुरुष संघ आणि पाच महिला संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवून चुरशीच्या लढती सादर केल्या.

उद्घाटनप्रसंगी प्रा. डॉ. साहेबराव भुकन यांनी खेळ ही मानवाची सहज प्रवृत्ती असून खेळाच्या माध्यमातून शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकास साधता येतो, असे सांगत विद्यार्थ्यांनी अधिकाधिक क्रीडास्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा देत, खेळाकडे केवळ छंद म्हणून नव्हे तर करिअर म्हणून पाहिले पाहिजे, नियमित सरावातून राज्य व देशाचे नाव उज्ज्वल करण्याची संधी खेळाडूंना मिळू शकते, असे प्रतिपादन केले.

स्पर्धेच्या निकालात पुरुष गटात के. सी. ई. सोसायटीचे शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला, मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव द्वितीय तर नुतन मराठा महाविद्यालय, जळगाव तृतीय क्रमांकावर राहिले. महिला गटात डॉ. आण्णासाहेब जी. डी. बेडाळे महिला महाविद्यालय, जळगाव यांनी प्रथम, धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर यांनी द्वितीय आणि नुतन मराठा महाविद्यालय, जळगाव यांनी तृतीय क्रमांक पटकावला. विजयी संघांना पुढील विभागीय स्पर्धेत धनाजी नाना महाविद्यालयात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

स्पर्धेचे पंचकाम जळगाव जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशनच्या पंचांनी पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारीरिक शिक्षण संचालक डॉ. गोविंद सदाशिवराव मारतळे यांनी केले, तर आभार प्रा. शिवाजी मगर यांनी मानले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. डॉ. ए. के. पाटील, प्रा. डॉ. गोविंद मारतळे, प्रा. शिवाजी मगर आणि राजेंद्र ठाकूर यांनी विशेष परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound