
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । “सरकार आता सगळंच फुकट देतंय. धान्य फुकट, वीज फुकट… त्यामुळे इच्छाशक्ती कमजोर होत आहे,” अशी परखड भूमिका मांडत फुकटच्या सवयींमुळे समाजाची पंगू अवस्था निर्माण होत असल्याचे प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले. केशवस्मृती प्रतिष्ठान व जळगाव जनता सहकारी बँक लि. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार” सोहळ्यात ते बोलत होते.

शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात समाजाच्या तळागाळात निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या सेवाव्रतींचा गौरव करण्यात आला. व्यासपीठावर अनुराधा भोसले, विलास शिंदे, केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. भरतदादा अमळकर, बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने, सीईओ संजय नागमोती आदी मान्यवर उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली, तर सुयोग गुरव यांनी गीत सादर करून वातावरण भारावून टाकले.
पोपटराव पवार यांनी आपल्या भाषणात सांगितले की, क्रीकेटची आवड असताना अपघाताने गावाकडे आलो आणि गावातील दारूबंदी, पाणीटंचाई यांसारख्या प्रश्नांशी सामना केला. “टीमवर्क आणि समर्पणाशिवाय कोणतेही काम तडीस जात नाही,” असे ते म्हणाले. 75 वर्षांपूर्वी निसर्गाकडून जे घेतले ते परत न केल्यास भविष्यात मोठे संकट उभे राहील, असा इशाराही त्यांनी दिला. तापमान बदल, पाणी व मातीचे प्रदूषण आणि त्यातून उद्भवणारे आरोग्याचे प्रश्न ही जागतिक पातळीवरील गंभीर आव्हाने असल्याचे त्यांनी नमूद केले. सध्याच्या तणावग्रस्त वातावरणात तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे झुकत असल्याची खंत व्यक्त करत पुढील दशकात तरुणाईसमोर उभ्या राहणाऱ्या आव्हानांचा गांभीर्याने विचार करण्याचे आवाहन त्यांनी केले.
पुरस्कार स्विकारल्यानंतर उत्तर देताना अनुराधा भोसले यांनी केशवस्मृती प्रतिष्ठानच्या विविध प्रकल्पांना भेट दिल्यानंतर कार्यकर्त्यांमधील सेवाभाव आणि आत्मीयतेचे कौतुक केले. 2002 मध्ये अवनि संस्थेची पहिली शाळा सुरू केली, 2005 च्या पुरात सर्व काही वाहून गेले, मात्र समाजाच्या पाठबळामुळे आज संस्थेचे कार्य विस्तारले असल्याचे त्यांनी सांगितले. बालमजुरी करणाऱ्या मुलांमध्ये स्वतःचे बालपण पाहिल्याने शिक्षणालाच प्राधान्य दिले, असे त्या म्हणाल्या. शहर स्वच्छतेचा विडा केशवस्मृती प्रतिष्ठानने उचलावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
संस्थास्तरीय पुरस्कार स्वीकारताना विलास शिंदे यांनी शेतीतील वाढता गुंता आणि बाजारव्यवस्थेतील अडचणींवर भाष्य केले. “शेती ही सेवा नसून व्यवसाय म्हणून स्वीकारण्याची गरज आहे,” असे मत त्यांनी मांडले. चांगले उत्पादन, योग्य विपणन आणि साठवण व्यवस्था उभी राहिल्याशिवाय शेतीत यश मिळणार नाही, असे ते म्हणाले. कांद्याच्या प्रश्नावरून होणारी आंदोलने हा व्यवस्थेतील त्रुटींचा परिणाम असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या सोहळ्यात अनुराधा भोसले यांना वैयक्तिक तर मोहाडी (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथील सह्याद्री फार्मर्स कंपनीला संस्थास्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. वैयक्तिक पुरस्कारामध्ये शाल, मानपत्र आणि एक लाख रुपयांचा धनादेश, तर संस्थास्तरीय पुरस्कारामध्ये शाल, मानपत्र आणि दीड लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. मानपत्र वाचन वैजयंती पाध्ये आणि दीप्ती बारी यांनी केले.



