बोदवड प्रतिनिधी । दिवंगत आईच्या तेरवीसह इतर खर्च टाळून तो निधी गरजू सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेला देण्याचा आदर्श निर्णय येथील पत्रकार पुरुषोत्तम गड्डम यांनी घेतला असून याचे परिसरातून स्वागत करण्यात येत आहे.
येथील पत्रकार तथा शिक्षक पुरुषोत्तम गड्डम यांच्या मातोश्री उमादेवी संभाजीराव गड्डम यांचे नुकतेच वयाच्या ८८व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झत्तले. अंतिम संस्कार पार पाडून आले दुःख विसरुन तेरवीचा कार्यक्रम त्यांनी पाचव्या दिवशी उरकून घेतला. आणि तेराव्याच्या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन सुमारे एक लाख रुपयांची रक्कम सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेला दान करण्याचा निर्णय पुरुषोत्तम गड्डम, सौ. माधुरी गड्डम आणि परिवाराने घेतला. या अनुषंगाने पहिला चेक आत्मसन्मान फाऊंडेशनला प्रदान करण्यात आला.
समाजातील वंचित तथा गरजू घटकांना गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आत्मसन्मान फाऊंडेशनचे कार्य कौतुकास्पद आहे. सन २०१३मध्ये नाडगाव (बोदवड) येथे या संस्थेची स्थापना विजय पाटील यांनी केली. आज या फाऊंडेशनचे कार्य औरंगाबाद, बुलढाणा, मुंबई जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. या सामाजिक संस्थेला समाजकार्य करण्यासाठी बळ मिळावे म्हणून २५ हजार रुपयांचा धनादेश पुरुषोत्तम गड्डम व सौ. माधुरी गड्डम यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा सौ. रोहिणीताई खडसे-खेवलकर, जिल्हा दूध संघाचे संचालक मधुकर राणे, सभापती गणेश पाटील, आत्मसन्मान फाऊंडेशनचे पदाधिकारी डॉ. प्रशांत बडगुजर, प्रा. बी. जी. माळी, अमोल पाटील, तसेच सचिन राजपूत, विनोद कोळी, कल्पेश शर्मा, पांडुरंग नाफडे, सूरज राजपूत तथा परिसरातील नागरिक उपस्थित होते. यासोबत एक लाख देणगीतील उर्वरित रक्कम समान पध्दतीने गृप एज्युकेशन सोसायटी एणगाव संचलित गो. दे. ढाके विद्यालय तथा नाशिक येथील शिवपुत्र संभाजी राजे बहुउद्देशीय संस्थेला दान करण्याचा निर्णय पुरुषोत्तम गड्डम यांनी जाहीर केला आहे.
तेरावी किंवा आदी धार्मिक कार्यक्रमावरील खर्चात कपात करुन वेळेची व पैशांची बचत केली आणि तेरवी कार्यात खर्ची होणारी रक्कम सामाजिक व शैक्षणिक संस्थेला दान केली. हा पत्रकार पुरुषोत्तम गड्डम यांचा समाजहिताचा उपक्रम प्रेरणादायी असलयाचे मत यावेळी रोहिणीताई खडसे यांनी व्यक्त केले.