मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. आतापर्यंत 2 कोटी 40 लाखांपर्यंत अर्ज करण्यात आले असून, राज्यातील महिला वर्ग योजनेपासून वंचित राहता कामा नये, अशी सरकारची धारणा आहे.
राज्याच्या महिला आणि बालविकस विभागाने जुलै महिन्यात या योजनेला सुरुवात केली आणि 17 ऑगस्ट पासून लाभार्थी महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्याचे प्रत्येकी दीड हजार रुपायाप्रमाणे तीन हजार रुपयांची रक्कम जमा झाली. 2 कोटी 40 लाख महिलांचे अर्ज आले आहेत, यातील दीड कोटी महिलांच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे.
उर्वरित 40 ते 42 लाख महिलांचे बँक खाते, आधार आणि मोबाईल क्रमांक लिंक नसल्याने ते जोडण्याचे काम सुरू आहे. ते झाले की उर्वरित महिलांना देखील लगेच या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती महिला व बालविकास विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.