मग देशात घोषित आणीबाणी आहे का? : उद्धव ठाकरे

मुंबई । देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी असल्याची टीका केली आहे. यावर महाराष्ट्रात जर अघोषित आणीबाणी असेल तर मग देशात घोषित आणीबाणी आहे का? असा सवाल करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिले आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विरोधी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. 

राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहव मंत्री अनिल परब, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आदी नेते उपस्थित होते.

याप्रसंगी उध्दव ठाकरे म्हणाले की, आंदोलन करणारे शेतकरी हे डावे आहेत, अतिरेकी आहेत, पाकिस्तानी-चिनी आहेत की आणखी कुठून आले आहेत हे भाजपाच्या सर्व नेत्यांनी एकदा ठरवावे. जर शोध लागत असेल तर त्यांची फेरयंत्रणा फार प्रभावी मानावी लागेल. आपल्याच अन्नदात्यावर अन्याय करताना त्याला तुम्ही देशद्रोही आणि अतिरेकी ठरवणे हे आपल्या संस्कृतीत बसत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

जर राज्यात अघोषित आणीबाणी असेल तर मग देशात घोषित आणीबाणी आहे का? असा प्रश्‍न ठाकरे यांनी विचारला. ते पुढे म्हणाले की, शेतकरी दिल्लीच्या सीमेवर त्यांच्या न्याय हक्कासाठी ठाण मांडून बसले आहेत. त्यांच्याशी नीट बोलणे, त्यांच्या भावना समजून घेणे, या गोष्टी तर सोडाच पण भर थंडीत शेतकर्‍यांना उघड्यावर बसावे लागत आहे. त्यांच्यावर थंडगार पाण्याचे फवारे मारले जात आहेत. हे काही सद्भावनेचे लक्षण नाही. जर याची व्याख्याच त्यांना बदलायची असेल तर ते बदलू शकतात, असे उद्धव ठाकरे म्हणाले. जनतेत कुठंही सरकारबद्दल नाराजी किंवा असमाधान असल्याचा सूर नाही. विरोधी पक्षांच्या नावातच विरोधी आहे, त्यामुळे त्यांना विरोधी या शब्दाला जागावे लागते. ते जे काही म्हणताय ते त्यांच्यापुरते बरोबर आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

 

Protected Content