भुजबळ व वडेट्टीवार तेढ निर्माण करताय ! : विनायक मेटे

मुंबई प्रतिनिधी । ओबीसी आरक्षणावरून छगन भुजबळ व विजय वडेट्टीवार हे प्रक्षोभक वक्तव्ये करून सामाजिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केला आहे.

विनायक मेटे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, मराठा समाजातील कोणत्याही नेत्याने ओबीसींमधून आरक्षण मागितलेलं नाही. पण ठाकरे सरकारमधील ओबीसी मंत्री आणि राज्यातील ओबीसी नेते मराठा आरक्षणावरून बेताल वक्तव्य करत आहेत. त्यांनी मोर्चे, आंदोलनंही सुरू केली असून वातावरण चिघळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ओबीसी नेत्यांचे हे मोर्चे, मेळावे सरकार पुरस्कृत आहेत का? राज्यातील मंत्री छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार आणि शेंडगे हे राज्यातील वातावरण खराब करत असून सरकारने त्यांच्यावर कोणताही अंकूश ठेवलेला नाही. त्यामुळे सरकारने राज्यातील वातावरण खराब करण्याचा निर्णय घेतला आहे का? दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा, द्वेष निर्माण करण्याचा कार्यक्रम सरकारने हाती घेतला आहे का? असे प्रश्‍न विनायक मेटे यांनी याप्रसंगी विचारले.

विनायक मेटे पुढे म्हणालेत की, ओबीसी नेते, मंत्री आरक्षणावर बोलत असताना सरकारमधील मराठा मंत्री गप्प का बसलेले आहेत? छगन भुजबळ ओबीसी आरक्षणावर बोलतात मग उपमुख्यमंत्री अजित पवार मराठा आरक्षणावर का बोलत नाहीत? विजय वडेट्टीवार बोलतात मग महसूल मंत्री बाळासाहेब थोरात का भूमिका घेत नाहीत? माजी आमदार प्रकाश शेंडगे बोलतात मग नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई मौन बाळगून का आहेत? मराठा आमदारही मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नावर गप्प का आहेत? असा सवालही त्यांनी केला. तर या अधिवेशनात मराठा आरक्षणावर चर्चा व्हावी अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.

 

Protected Content