देशभरात आतापर्यंत उष्माघातामुळे ५४ जणांचा गेला बळी

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मध्य, ईशान्य, आणि उत्तर भारतातील अनेक ठिकाणी उष्णतेची लाट जाणवत आहे. यामुळे अनेकजण उष्माघाताचे बळी पडले असून आतापर्यंत ५४ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. उत्तर भारतात अनेक ठिकाणी ४५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. दि. ३१ मे ते १ जून दरम्यान उत्तर प्रदेशमध्ये आणि ३१ मे रोजी हरियाणा, चंदीगढ आणइ दिल्लीत धुळीचे वादळ धडकणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ३१ मे ते २ जून दरम्यान वायव्य भारतातील मैदानी भागात गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासंह हलक्या सरी पडण्याचा अंदाज आहे. दिल्लीमध्ये गुरुवारी सर्वाधिक ४५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सामान्य तापमानापेक्षा यामध्ये ५.२ सेल्सिअसची अधिक भर आहे. राजधानी दिल्लीमध्ये पहिल्यांदाच ७९ वर्षांचा उच्च तापमानाचा विक्रम यानिमित्ताने मोडीत निघाला आहे.

बिहारमध्ये सर्वाधिक ३२ लोक उष्माघातमुळे मरण पावले आहेत. बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यात १७, अराहमध्ये ६, गया आणि रोहतसमध्ये प्रत्येकी तीन, बक्सर आणि पाटणा येथे प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. ओडिशामधील रुरकेला येथे १० जणांचा मृत्यू झाला. झारखंड आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी पाच जणांचा मृत्यू झाला. तर उत्तर प्रदेशच्या सुलतानपूरमध्ये एक व्यक्तीचा मृत्यू झाला. दरम्यान बिहारमधील ४० वर्षीय व्यक्तीचा दिल्लीत उष्माघातामुळे मृत्यू झाला. या व्यक्तीच्या शरीराचे तापमान १०८ अंश फॅरेनहाइट पर्यंत पोहोचले होते, त्यामुळे त्याच्या शरीरातील एक – एक अवयव निकामी होत गेला. शरीराच्या साधारण तापमानापेक्षा हे तापमान १० अंशांनी अधिक होते.

गुरुवारी राजस्थान, हरियाणा, चंदीगढ, दिल्ली या राज्यातील तापमान ४५ ते ४८ अंश सेल्सिअसपर्यंत गेलेले पाहायला मिळाले, असे हवामान खात्याने सांगितले. पश्चिम मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेशचा किनारपट्टीचा भाग, येणम आणि गुजरातमधील काही भागात ४२ ते ४५ डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान असल्याचे निदर्शनास आले. नेहमीपेक्षा हे तापमान ३ ते ६ अंशांनी अधिक असल्याचे दिसले. यापुढे म्हणजे ३१ मे ते १ जूनपर्यंत पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि ओडिशा या राज्यात मोठ्या प्रमाणात उष्णतेचा कहर दिसून येणार असल्याचेही हवामान विभागाने सांगितले आहे.

Protected Content