जळगाव (प्रतिनिधी) भांडी, दागिने उजळून देण्याच्या बहाण्याने घरात घुसत महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी जबरीने तोडून पळ काढल्याची खळबळजनक घटना शहरातील सुप्रिम कॉलनीत आज दुपारी घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, सुप्रीम कॉलनी यास्मिन जुनेद खान या आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास मुलांसोबत आपल्या घरात होत्या. यावेळी अज्ञात ढग त्यांच्या घरी आला आणि मी जुनी भांडी, दागिने उजळून देण्याचे काम करतो असे सांगत घरात प्रवेश मिळविला. यानंतर भामट्याने सोबत आणलेल्या पावडरने जुनी भांडी उजळून दाखवली. त्यानंतर त्याने आपण सोन्याचे दागिने देखील या पावडरने उजळून देऊ शकतो, असे सांगीतले. परंतू, यास्मीन यांनी सोन्याचे दागिने त्याच्याकडे दिले नाहीत. यानंतर भामट्याने सोबत असलेला एक स्टीलचा डबा यास्मीन यांना देऊन त्यात पाणी गरम करुन आणून द्यायची विनंती केली. यास्मीन या गॅसवर पाणी गरम करुन आणत असताना संधी साधून भामट्याने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी तोडून पळ काढला. यास्मीन यांच्या हातात गरम पाण्याचे भांडे असल्यामुळे त्या प्रतिकार देखील करु शकल्या नाही. यास्मीन यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दिली असून पोलिस भामट्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, भर दिवसा भामट्याने घरात प्रवेश करून सोनसाखळी लांबविल्याच्या घटनेमुळे महिलांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.