स्कॉर्पिओतून गुटख्याची तस्करी : मुक्ताईनगर पोलिसांची कारवाई

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथून महामार्गावरून जाणार्‍या स्कॉर्पिओ वाहनातून गुटख्याची तस्करी उघड झाली असून पोलिसांनी वाहन जप्त करून एकाला गजाआड केले आहे.

मुक्ताईनगर परिसरातून गुटख्याची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याचे आढळून आले आहे. काही दिवसांपूर्वीच नाशिक येथील आयजी यांच्या पथकाने गुटख्याची वाहतूक करणारा कंटेनर पकडून तब्बल एक कोटींपेक्षा जास्त रूपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. यानंतर आज मुक्ताईनगर पोलिसांनी केलेल्या कारवाईत स्कॉर्पिओ वाहनातून होणार्‍या गुटखा तस्करीचा पर्दाफाश झाला आहे.

मुक्ताईनगर पोलिसांना बर्‍हाणपूरवरून एक स्कॉर्पिओतून गुटखा येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार पोलिसांनी सापळा रचून काल रात्री पावणेआठ वाजेच्या सुमारास एमएच२७ डीएल-२४९६ क्रमांकाच्या स्कॉर्पिओला थांबविले असता यातून २२ लाख ३८ हजार ५० रूपयांचा अवैध गुटखा आढळून आला. पोलिसांनी गाडीचा चालक अजीज शेख बाबू शेख ( रा. झांसी नगर, रिसोड, जिल्हा वाशिम) याला अटक केली असून त्याच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता २०२३च्या कलम-१२३, २७४, २७५, २२३ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदर कारवाई ही डीवायएसपी राजकुमार शिंदे व पोलीस निरिक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखालील उपनिरिक्षक राहूल बोरकर, राजेंद्र खनके, छोटू वैद्य, देवसिंग तायडे, विशाल सपकाळे व निखील नारखेडे यांच्या पथकाने केली.

दरम्यान, मुक्ताईनगरसह परिसरातून मोठ्या प्रमाणात गुटख्याची वाहतूक होत असून या प्रकारच्या कारवायांमध्ये सातत्य हवे अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Protected Content