Home क्रीडा स्मृती, जेमिमा आणि राधा यादव यांचा राज्य सरकारकडून गौरव ; प्रत्येकी सव्वादोन...

स्मृती, जेमिमा आणि राधा यादव यांचा राज्य सरकारकडून गौरव ; प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस 


मुंबई–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । भारतीय महिला क्रिकेट संघाच्या विश्वविजेत्या कामगिरीचा उत्सव साजरा करत महाराष्ट्र सरकारने राज्यातील तीन तगड्या महिला क्रिकेटपटूंचा विशेष सत्कार केला. स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज आणि राधा यादव या महाराष्ट्राच्या तीन तेजस्वी खेळाडूंना प्रत्येकी सव्वादोन कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले. तर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांना २२ लाख ५० हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

हा भव्य सत्कार सोहळा शुक्रवारी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या तिन्ही महिला खेळाडू आणि मुख्य प्रशिक्षकांना धनादेश प्रदान करण्यात आले. या प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, प्रधान सचिव संजय खंडारे, क्रीडा आयुक्त शीतल तेली आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी भारतीय संघाच्या चिकाटी, समर्पण आणि जिद्दीचे भरभरून कौतुक केले. त्यांनी म्हटले की, “या तिन्ही मुलींनी आणि त्यांच्या संघाने संपूर्ण देशाला अभिमानाची अनुभूती दिली आहे. आता भारतीय संघाने पुढील ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकावे, अशी अपेक्षा आपण सर्वजण करतो.”

यावेळी सपोर्ट स्टाफचाही सन्मान करण्यात आला. गोलंदाज प्रशिक्षक आविष्कार साळवी, पद्मश्री डायना एडलजी, विश्लेषक अनिरुद्ध देशपांडे, लॉजिस्टिक सपोर्ट अपर्णा गंभीरराव, मिहिर उपाध्याय, पूर्वा काटे, आणि ममता शिररुल्ला यांना प्रत्येकी ११ लाख रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. या सर्वांच्या योगदानामुळे भारतीय संघाने जागतिक स्तरावर आपला झेंडा अभिमानाने फडकवला, असे मुख्यमंत्री म्हणाले.


Protected Content

Play sound