शहरातील श्रीराम नगर भागात आज दुपारी अचानकपणे एका गटारी जवळील जमिनीतून धूर बाहेर पडत असल्याचे रहिवाशांच्या निदर्शनास आले असता त्यांनी तिथे कोडून बघितले असता जमीन तापलेली आढळून आली व धूर सतत बाहेर पडत होता. जमिनीवर पाणी भरून भांडे ठेवले असता त्यातले पाणीही गरम झाले. या प्रकारामुळे शहरासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या ठिकाणाहून सायंकाळपर्यंतही धूर निघतच असल्याचे रहिवाशांनी सांगितले. जमिनीतून धूर निघण्याचा हा प्रकार नेमका काय याची नागरिकांना उत्सुकता लागली असून या भागात भूकंप अथवा ज्वालामुखी सारखा प्रकार तर नसावा, अशी शंका उपस्थित होत आहे. तसेच उनपदेवसारखा काही प्रकार आहे की, मध्यंतरी बीड जिल्ह्यात उघडकीस आलेला तुटलेल्या विजतारेच्या प्रवाहामुळे मुरुमाचे दगड विरघळण्यासारखा वीज प्रवाहाचा काही संबंध याठिकाणी नसावा ना ? अशा एक ना अनेक शंका उपस्थित होत आहेत. प्रशासनाने या प्रकारची त्वरित दखल घेवून कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.