Home उद्योग दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर ;  60 कुटुंबांना मिळाल्या नव्या वीजजोडण्या

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर ;  60 कुटुंबांना मिळाल्या नव्या वीजजोडण्या


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धुळे जिल्ह्यातील दुर्गम भागात वसलेल्या दरेगाव आंबापाडा (ता. साक्री) येथे महावितरणच्या जळगाव परिमंडलातर्फे ‘प्रकाशमान गाव अभियान’ अंतर्गत विशेष जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात शासनाच्या स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप (स्मार्ट) योजनेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली असून, विशेष मोहिमेत तब्बल 60 ग्रामस्थांना नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या.

या कार्यक्रमाला महावितरणच्या जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता इब्राहिम मुलाणी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यासोबतच धुळे मंडलाचे अधीक्षक अभियंता सायस दराडे, धुळे ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रीतम काळे तसेच दरेगावच्या सरपंच जयंतीताई भोये यांनीही उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

मेळाव्यात बोलताना मुख्य अभियंता इब्राहिम मुलाणी यांनी स्मार्ट योजनेचे फायदे सविस्तरपणे मांडले. दारिद्र्यरेषेखालील ग्राहकांसाठी एक किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प बसविण्यास केंद्र सरकारकडून 30 हजार रुपये तर राज्य सरकारकडून 17 हजार 500 रुपये अनुदान मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. उर्वरित रक्कम भरल्यानंतर ग्राहकांना तब्बल 25 वर्षे मोफत वीज मिळू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या योजनेचा लाभ केवळ दारिद्र्यरेषेखालीलच नव्हे, तर दरमहा 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्राहकांनाही होणार आहे. केंद्र सरकारच्या अनुदानासोबतच राज्य सरकारकडून सर्वसाधारण ग्राहकांना 10 हजार रुपये, तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील ग्राहकांना 15 हजार रुपये अतिरिक्त अनुदान दिले जाणार आहे.

एक किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पातून दरमहा सुमारे 120 युनिट वीज निर्मिती होते. त्यामुळे 100 युनिटपर्यंत वीज वापरणारे ग्राहक स्वतःची गरज भागवून उरलेली वीज महावितरणला विकू शकतात. हा प्रकल्प सुमारे 25 वर्षे वीज निर्मिती देत असल्याने दीर्घकाळ आर्थिक बचत होते, असेही मुलाणी यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पिंपळनेर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता योगेश काळे यांच्यासह कुडाशी कक्ष अभियंता व महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या मेळाव्यास गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून स्मार्ट योजनेबाबत उत्सुकता व्यक्त केली आणि विजेबाबत स्वयंपूर्ण होण्याचा निर्धार केला.


Protected Content

Play sound