एरंडोल प्रतिनिधी । येथील बस स्थानकावर स्मार्ट कार्डची नोंदणी सुरू करण्यात आली असून एकच संगणक असल्याने लांबलचक रांग लागत असल्याचे दिसून येत आहे.
याबाबत वृत्त असे की, येथील बस स्थानकावर ५ जून पासून स्मार्ट कार्ड नोंदणीचे काम सुरु असून आता पर्यंत ६०४ ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी झालेली आहे. विशेष म्हणजे एकाच संगणकावर महिला व पुरुषांच्या नोंदणीचे काम सुरु असल्यामुळे लांबच लांब रांगा दिसून येतात. अक्षरशः ज्येष्ठ नागरिक हैराण होऊन खाली बसतात. दरम्यान महिलांसाठी एक संगणक व पुरुषांसाठी दुसर्या संगणकाची सुविधा देऊन नोंदणीचे कामाला गती देणे आवश्यक असून वृद्धांचे हाल थांबवावी अशी मागणी होत आहे.
दरम्यान, भल्या पहाटे ५ वाजेपासून लवकरच नोंदणी व्हावी म्हणून काही ज्येष्ठ नागरिक नंबर लावण्याकरिता बस स्थानकावर हजेरी लावतात. सकाळी ९ वा. पासून ते सायंकाळी ४ वाजता पर्यंत नोंदणी केली जाते. त्यानंतर रांगेत उभ्या असलेल्या लोकांची नावे लिहून घेतली जातात व दुसर्या दिवशी त्यांना पुन्हा बस स्थानकावर यावे लागते. यामुळे एकाच दिवशी नोंदणीचे काम व्हावे अशी मागणी आहे. लक्षणीय बाब म्हणजे संपूर्ण तालुक्यातूनच नव्हे तर बस स्थानकावर बाहेरून आलेले प्रवासी सुद्धा नोंदणीसाठी रांगेत उभे राहतात. ज्येष्ठ नागरिक नोंदणीसाठी बस स्थानकावर येतात तासंनतास रांगेत उभे राहवे लागत असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना हालअपेष्ठा सहन कराव्या लागतात. बस स्थानकावर विलास पाटील ( वाहक ) हे संगणकावर नोंदणीचे काम पाहतात. दरम्यान आगर व्यवस्थापक विजय पाटील यांनी स्मार्ट कार्ड योजनेचा ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.