सिंधू खोऱ्यात सहा वर्षांनी घुसखोरी : दोन दहशतवादी ठार

 

terrorist terror1

द्रास, वृत्तसंस्था | जम्मू-काश्मीरमध्ये हिवाळा सुरू होण्यापूर्वी पाकिस्तानने अतिरेक्यांना पाठवण्यासाठी कंबर कसली आहे. पण सुरक्षा दलांच्या दक्षतेमुळे पाकिस्तानचे हे प्रयत्न धुळीला मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे. आपले प्रयत्न हाणून पाडले जात असल्याचे लक्षात आल्याने पाकिस्तानने दहशतवाद्यांच्या घुसखोरीच्या वेगवेगळ्या मार्गांची चाचपणी सुरू केली आहे. अशाच प्रयत्नात असलेल्या दोन दहशतवाद्यांचा भारतीय लष्कराने सिंधू खोऱ्यातील गुरेज सेक्टरमध्ये खात्मा केला. सहा वर्षांनंतर या भागात ही पहिलीच घुसखोरीची घटना उघडकीस आली आहे.

 

याबाबत लष्करातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घुसखोरीची ही घटना २७ सप्टेंबर आणि ३ ऑक्टोबरला झाली. गेली काही वर्षे सिंधू खोरे शांत होते. इथे शेवटचे दहशतवाद विरोधी अभियान ऑगस्ट २०१३ मध्ये राबवण्यात आले होते. नियंत्रण रेषेच्या सर्वच बाजूंनी दहशतवाद्यांना भारतात घुसवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न असल्याचे एका लष्करी अधिकाऱ्याने सांगितले. या मुळे खोऱ्यातील जनता दहशतीखाली असून पाकिस्तानी दहशतवाद्यांपासून आपल्या जीवाला धोका असल्याची भीती लोकांना सतावत असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.

ग्रेनेड लॉन्चरसह दोन दहशतवादी शिरणे हे चिंताजनक असल्याचे लष्करातील सूत्रांनी सांगितले आहे. या परिसरात जिप्सी समुदायाचे लोक राहतात. हे लोक अक्रोड आणि जडीबुटींचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह चालवतात. दरम्यान, आखातात राहणाऱ्या एका व्यक्तीच्या फोनकॉलची गांदरबल आणि कारगिल पोलीस तपास करत आहेत.

जम्मू आणि काश्मीरमधील गुप्तचर यंत्रणेतील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ठार मारण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांकडून वायरलेस व्हीएचएफ सेट हस्तगत करण्यात आला आहे. याचाच अर्थ हे दहशतवादी पाकिस्तानात बसलेल्या आपल्या म्होरक्यांच्या संपर्कात होते असा होत असल्याचे हा अधिकारी म्हणाला. एका कुटुंबाने ज्या शवाचा दावा केला, त्या शवाची डीएनए चाचणी करण्यात येणार येत असल्याचे अधिकारी म्हणाला. या कुटुंबाला सौदी अरबमधून या शवाबाबत कुणीतरी फोन केला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या फोन करणाऱ्या व्यक्तीचाही शोध घेण्याचे काम पोलीस करत असल्याचेही अधिकारी म्हणाला.
पाकिस्तानातून भारतात घुसू पाहणाऱ्या दहशतवाद्यांचा लष्करी तळ आणि कार्यालयांवर हल्ले करण्याची योजना असल्याती माहिती गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागली आहे. ठार मारण्यात आलेले दोन दहशतवागी श्रीनगर आणि अवंतीपोरामधील हवाई दलाच्या ठिकाणांवर हल्ले करण्याच्या तयारीत होते. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच जम्मू, श्रीनगर आणि लेह विमानतळांवरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

Protected Content