वीजप्रवाह उतरलेल्या खांबाचा सहा जणांना शॉक ; एकाचा जागीच मृत्यू

 

चाळीसगाव , प्रतिनिधी । तालुक्यातील पिंपरखेड तांडा शिवारातील शेतातल्या वीज खांबाच्या तारेला स्पर्श झाल्याने आजोबा आणि नातू चिकटल्यानंतर त्यांना वाचविण्यासाठी धावलेल्या अन्य चार जणांनीही त्यांना स्पर्श केल्याने सहाजण एकमेकांना चिकटले. या वेळी आलेल्या तरुणाने प्रसंगावधान राखत लाकडी बांबूने वीज वाहिनीवर प्रहार केल्याने खंडित झालेल्या वीज प्रवाहात सहा जण विजेच्या स्पर्शापासून अलिप्त झाले. मात्र, तोपर्यंत यातील एकाचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर आहेत.

शेतात काम करताना मोतीलाल राठोड (वय ७०) आणि त्यांचा नातू सोनू राठोड (वय १५) या दोघांचा विजेच्या खांबाला जोडून असलेल्या तारेला स्पर्श झाला. तारेत वीजप्रवाह असल्याने हे दोघे चिकटले. हे पाहत त्यांना वाचविण्यासाठी शेजारील शेतातून त्यांचे चार नातेवाईक आरडाओरड करीत वाचविण्यासाठी आले. तारांना त्यांचा गदारोळात स्पर्श झाल्याने ते देखील चिकटले, असे हे सगळे सहा जण एकमेकांना चिकटले.

विज प्रवाह उतरलेल्‍या विज खांबाला सहा जण चिकटल्‍याचे पाहून त्यांचाच नातेवाईक किरण राठोड याने लाकडी टोकराने वीज प्रवाह असलेल्या तारेवर प्रहार करुन प्रवाह खंडित करताच चिकटलेले सहाही जण वीजप्रवाह असलेल्या तारेपासून अलिप्त झाले. मात्र तोपर्यंत गोकूळ राठोड मृत झाला होता. दोघे गंभीररीत्या भाजले गेले. त्यांना चाळीसगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. अन्य दोघेही किरकोळ भाजले आहेत. पिंपरखेड शिवारातील या घटनेने परिसरात वीज खाम्बाबद्दल दहशत पसरली आहे

किरण राठोड याने वीजप्रवाह प्रसंगावधान राखून खंडित केला. त्यामुळे अन्य पाच जणांचा जीव वाचला. मात्र, गोकूळ राठोड याचा या घटनेत मृत्यू झाल्याने राठोड कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मृत गोकुळच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

Protected Content