जळगाव (प्रतिनिधी) विमानतळ योजनेतील गैरव्यवहार व अनियमितताप्रकरणी दाखल गुन्ह्यात आज प्रदीप रायसोनींसह सहा संशयितांना जामीन मिळाला. याप्रकरणी पूर्वी झालेल्या कामकाजावेळी आठ संशयित गैरहजर राहिल्याने त्यांना न्यायालयाने 14 फेब्रुवारी ही तारीख हजर राहण्यासाठी दिली होती. त्यानुसार सिंधू कोल्हे वगळता इतर सर्व सहा संशयित आज न्यायालयात हजर झाले होते. न्यायमूर्ती बी.जी. गोरे यांच्या न्यायालयात कामकाज होऊन सगळ्यांना वीस हजार रुपये रोख व वीस हजार रुपयांचा जातमुचलका आणि 20 हजारांचा पी.आर.बॉन्ड अशा प्रत्येकी 60 हजार रुपयांच्या रकमेवर जामीन मंजूर करण्यात आला आहे.
जमीन मंजूर करण्यात आलेल्यांमध्ये प्रदीप रायसोनी, लक्ष्मीकांत तुकाराम चौधरी, चत्रभुज सोमा सोनवणे, मुख्याधिकारी पंढरीनाथ धोंडिबा काळे, धनंजय दयाराम जावळीकर व अटलांटा कंपनीचे संचालक राजू बरोट यांचा समावेश आहे. हे सर्वजण दुपारी ३.०० वाजता न्यायालयात हजर झाले होते. यावेळी रायसोनी बरोट व चौधरी यांच्यातर्फे अॅड. प्रकाश पाटील तर चत्रभुज सोनवणे यांच्यातर्फे अॅड. गोविंद तिवारी तसेच पी.डी. काळे यांच्यातर्फे अॅड. नितीन जोशी तर धनंजय जावळीकर यांच्यातर्फे अॅड. इस्माईल यांनी काम पाहिले. दरम्यान न्यायालयाने माजी नगराध्यक्षा सिंधू कोल्हे गैरहजर राहिल्याने त्यांना न्यायालयात उपस्थित राहण्यासाठी पुन्हा समन्स बजावला आहे. आज यांच्यातर्फे कुणीही न्यायालयात हजर झाले नव्हते, तसेच वकिलामार्फत अर्जही दाखल करण्यात आला नव्हता, त्यामुळे हे समन्स काढण्यात आले आहेत.