सावदा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रक्षाबंधनाचा सण म्हणजे बंधुभाव, स्नेह, आणि नात्यांची नवी उब. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील बहिणींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील आपुलकी व्यक्त करत त्यांना राख्या अर्पण करत भावनिक कृतज्ञता व्यक्त केली. महिलांसाठी राबवलेल्या योजनांमुळे मुख्यमंत्री फडणवीस या बहिणींसाठी एक आधारस्तंभ ठरले आहेत, हेच या अनोख्या उपक्रमातून अधोरेखित झाले.
जिल्ह्यातील महिलांनी स्वतः तयार केलेल्या आणि प्रेमपूर्वक सजवलेल्या राख्या औपचारिकरीत्या राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि माजी मंत्री रक्षाताई खडसे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. या सोहळ्याला जिल्हाभरातून महिला, कार्यकर्त्या आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. रक्षाबंधनाच्या निमित्ताने रचलेल्या या सामाजिक उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि तो एक भावनिक क्षण ठरला.

या वेळी खासदार स्मिताताई वाघ, आमदार राजुमामा भाळे, महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष केतकीताई पाटील, जळगाव पूर्व जिल्हाध्यक्ष चंद्रकांतदादा बाविस्कर, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सुर्यवंशी, पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, उत्तर महाराष्ट्र संयोजिका रेखाताई वर्मा, जिल्हा संयोजिका सारीका चव्हाण, तसेच नवलसिंग पाटील, राजनदादा लासुरकर, उज्वला गोसावी यांच्यासह विविध मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले.
महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी घेतलेल्या निर्णयांबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानण्याचा हा एक भावनिक आणि सामाजिक प्रयत्न होता. रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहिणींनी केवळ एक राखी पाठवली नाही, तर त्यांच्या मनातील प्रेम, विश्वास आणि अपेक्षा देखील मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पोहोचवल्या.



